पुरस्कार सोहळ्यात शाहरुखचा का केला अपमान? 14 वर्षांनंतर नील नितीन मुकेशने केला खुलासा
त्या घटनेनंतर शाहरुख नील नितीन मुकेशवर नाराज झाला नव्हता. याउलट तो त्याला म्हणाला, "तू चांगलं केलंस." मी कधीच माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या कलाकारांचा अनादर करणार नाही, असंही नीलने या मुलाखतीत स्पष्ट केलं.

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : अभिनेता नील नितीन मुकेश हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहो’ चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने काही वर्षांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात झालेल्या घटनेविषयी वक्तव्य केलं. या पुरस्कार सोहळ्यात नील आणि शाहरुख खान यांच्यात कथित वाद झाल्याचं म्हटलं गेलं होतं. त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जेव्हा नील मंचावर येतो तेव्हा शाहरुख त्याला त्याचं आडनाव नेमकं काय आहे, असा प्रश्न विचारतो. इतकंच नव्हे तर नील, नितीन आणि मुकेश हे तिन्ही नावं असल्याने यात आडनाव आहे तरी कुठे, अशी मस्करी शाहरुख करतो. त्यावर भडकून नील त्याला सर्वांसमोर ‘शट अप’ असं म्हणतो.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नीलला यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो हसला आणि म्हणाला की त्याला शाहरुखचा अपमान करायचा नव्हता. उलट किंग खानविषयी मनात खूप प्रेम असल्याचं त्याने स्पष्ट केलं. “शाहरुख त्यावेळी मस्करी करत होता. त्यामुळे मीसुद्धा मस्करी करत होतो. हे त्यालाही माहीत होतं आणि मलाही माहित होतं. मंचावर आल्यानंतर माझ्यासोबत थोडीफार मस्करी केली जाईल, याची कल्पना मला देण्यात आली होती. मात्र नेमकं काय घडणार हे मला माहीत नव्हतं”, असं त्याने सांगितलं.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात घडलेला तो प्रसंग स्क्रिप्टेड होता का, असा सवाल विचारल्यावर नील पुढे म्हणाला, “तुम्ही जर असं म्हणत असाल, तर मी त्यावर विश्वास ठेवीन. जर तुम्हाला त्या घटनेला स्क्रिप्टेड म्हणायचं असेल तर ठीक आहे, पण त्यात प्रेम होतं. मी शट अप म्हटल्यानंतर शाहरुख माझ्यावर नाराज नव्हता. त्याने मला फक्त एवढंच सांगितलं होतं की मंचावर तो थोडीफार मस्करी करणार आहे. मी तुझ्यासोबत मस्करी करेन, तू सुद्धा तुला जे करायचं ते कर, असं त्याने मला आधीच स्पष्ट केलं होतं. त्यावर मी त्याला विचारलं की, सर कोणत्या पातळीच्या मस्करीबद्दल आपण बोलतोय? तर तो म्हणाला, तू जिथपर्यंत विचार करू शकतोस, त्या पातळीची मस्करी. शाहरुखने स्वत:हून मला स्वातंत्र्य दिलं होतं, म्हणून मी तसं म्हणालो.”




त्या घटनेनंतर शाहरुख नील नितीन मुकेशवर नाराज झाला नव्हता. याउलट तो त्याला म्हणाला, “तू चांगलं केलंस.” मी कधीच माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या कलाकारांचा अनादर करणार नाही, असंही नीलने या मुलाखतीत स्पष्ट केलं.