‘IC 814: द कंदाहार हायजॅक’मध्ये दहशतवाद्यांची नावं बदलण्यावरून वाद; नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुखांना समन्स
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'आयसी 814 द कंदहार हायजॅक' या वेब सीरिजचा वाद वाढला आहे. आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने थेट नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुखांना समन्स बजावले आहेत.
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 29 ऑगस्ट रोजी ‘आयसी 814 द कंदहार हायजॅक’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र या सीरिजवरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या कंटेंट हेडना दिल्लीला बोलावलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुख मोनिका शेरगील यांना मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मोनिका यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर वेब सीरिजमधील कथित वादग्रस्त पैलूंवर स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘हरकत-उल-मुहाहिद्दीन’ने 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट 814 ला हायजॅक केलं होतं. त्याचीच कथा ‘IC 814’ या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. यात दोन हायजॅकर्सची नावं जाणीवपूर्व हिंदू नावांमध्ये बदलल्याचा आरोप सोशल मीडियाद्वार केला जात आहे. दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक गैर-मुस्लिम नावं देण्यात आल्याचा आरोप नेटफ्लिक्सवर करण्यात आला आहे.
खऱ्याखुऱ्या हायजॅकिंगच्या घटनेवर आधारित या सीरिजमध्ये शेकडो प्रवाशांचा त्रासदायक अनुभव आणि त्यांची सुटका करताना सरकारसमोरील आव्हानांचं चित्रण करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान नियंत्रित कंदाहार याठिकाणी पोहोचण्याआधी ती फ्लाइट अनेक ठिकाणी वळवण्यात आली होती. सीरिजमधील हायजॅकर्सना चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी सांकेतिक नावं देण्यात आली आहेत. यातील भोला आणि शंकर या नावांच्या वापरामुळेच सीरिजवर टीका होत आहे. यात मुद्दाम हिंदू नावं निवडल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. या सीरिजचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यावर नेटकऱ्यांनी सत्याचा विपर्यास केल्याची टीका केली आहे. यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेला उधाण आलं आहे.
View this post on Instagram
या सीरिजची कथा पत्रकार श्रीजॉय चौधरी आणि देवी शरण, हायजॅक झालेल्या फ्लाइटचे कॅप्टन यांनी लिहिलेल्या ‘फ्लाइट इन्टू फिअर: द कॅप्टन्स स्टोरी’ या पुस्तकावर आधारित आहे. यात विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, मनोज पाहवा, अरविंद स्वामी, अनुपम त्रिपाठी, दिया मिर्झा, पत्रलेखा, अमृता पुरी, दिब्येंदु भट्टाचार्य आणि कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सीरिजवरून होणाऱ्या वादावर प्रतिक्रिया देताना कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने स्पष्ट केलं की गुन्हेगारांनी एकमेकांसाठी टोपणनावं वापरली होती आणि या सीरिजसाठी योग्य रिसर्ज केलं गेलंय.