मिसेस अन् गर्लफ्रेंड..; समंथासोबतच्या फोटोवरील कॅप्शन पाहून नाग चैतन्यवर भडकले नेटकरी
सोभिता धुलिपाला हिच्यासोबत साखरपुडा केल्यानंतरही नाग चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून समंथासोबतचा एक फोटो अद्याप डिलिट केला नाही. त्यावरून समंथाचे चाहते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. या फोटोचं कॅप्शन पाहून त्यांचा संताप अनावर झाला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. या साखरपुड्याचे फोटो दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. अशातच काही नेटकऱ्यांनी नाग चैतन्यला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एक जुना फोटो डिलिट करण्याची मागणी केली आहे. हा जुना फोटो पूर्व पत्नी आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबतचा आहे. सोभिताशी साखरपुडा केल्यानंतर त्याने सोशल मीडियावरील समंथासोबतचे काही फोटो डिलिट केले होते. मात्र 2018 मधील हा फोटो अजूनही त्याच्या अकाऊंटवर पहायला मिळतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘मिसेस आणि गर्लफ्रेंड’ असा समंथाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते त्याच्यावर आणखीनच चिडले आहेत.
या फोटोमध्ये समंथा आणि नाग चैतन्य एका स्पोर्ट्स कारसोबत दिसत आहेत. समंथा पाठमोरी उभी आहे तर नाग चैतन्यने हेल्मेट घातलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे. ‘इन्स्टाच्या फीडमध्ये फोटो असण्यात काही गैर नाही, पण कॅप्शन?’, असा सवाल एकाने केला. तर ‘कृपया हा फोटो डिलिट करून टाक’, असं दुसऱ्याने म्हटलंय. नाग चैतन्यच्या इन्स्टा अकाऊंटवर समंथासोबतचे आणखी दोन फोटो पहायला मिळतात. त्यापैकी एक ‘मजिली’ या चित्रपटाचा पोस्टर आहे. तर दुसरा त्याच चित्रपटाच्या टीमसोबतचा फोटो आहे. यामध्ये समंथासुद्धा दिसतेय.
View this post on Instagram
नाग चैतन्य आणि समंथा हे ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2017 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
कोण आहे सोभिता?
सोभिताने 2013 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया अर्थ’चा किताब पटकावला होता. यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनयविश्वात पदार्पण केलं. सोभिताने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. 2023 मध्ये तिने हॉलिवूडच्या ‘मंकी मॅन’मध्येही भूमिका साकारली होती. सोभिताचा जन्म 31 मे 1992 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. तिने 2016 मध्ये अनुराग कश्यपचा ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2019 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन हेव्हन’ या वेब सीरिजमुळे तिचा बरीच लोकप्रियता मिळाली.