फायनली भावाला मिळाली शालू… पॉवर ऑफ काळी चिमणी; जब्याच्या लग्नाच्या फोटोवर भन्नाट कमेंट
"फँड्री" चित्रपटातील शालू (राजेश्वरी) आणि जब्या (सोमनाथ) यांचा लग्नासारखा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर विनोदात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, हा फोटो खरा लग्नाचा आहे की नव्या चित्रपटाचा प्रचार आहे हे अजून स्पष्ट नाही
‘फँड्री‘ चित्रपटातून जब्या आणि शालूच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. जब्या आणि शालूची जोडी हिट ठरली होती आणि चर्चेतही आली. मात्र आता ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती म्हणजे एका फोटोमुळे. या चित्रपटातील ‘शालू’ म्हणजे राजेश्वरीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची चर्चा तर यांच्या जोडीपेक्षाही अधिक होताना पाहायला मिळतेय.
राजेश्वरीने सोशल मीडियावर जब्या म्हणजे सोमनाथ अवघडे आणि तिचा एक फोटो शेअर केला. ज्यात ती आणि सोमनाथ लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. पिवळी हळदीची साडी, डोक्यावर पदर, कपाळाला मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा असा लूक शालू म्हणजे राजेश्वरीचा दिसतोय तर, तिच्या बाजूला नवरदेवाच्या पेहरावात सोमनाथही डोक्याला मुंडावळ्या बांधून पाटावर बसल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे दोघंही गुपचूप लग्न केलं की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
दरम्यान या दोघांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मात्र मजेशीर कमेंट केल्या आहेत. जब्या अन् शालूचा लग्नाचा फोटो पाहून सगळ्यांनी आनंद व्यक्त करत रंजक पद्धतीने कमेंटस् केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की , ” झालं बाबा एकदाच… फॅन्ड्री पिक्चर बघितलेले पैसे फिटले आज”, एकाने लिहिले आहे की, “पॉवर ऑफ काळी चिमणी”,तर, एकाने थेट जब्याकडे राखच मागितली आहे. त्याने लिहिले आहे,” भाऊ चिमटभर राख भेटेल का मला पण”, एकाने आनंद व्यक्त करत लिहिले आहे ” शालु शेवटी जब्याचीच…”. अशा पद्धतीने नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत या दोघांच्याही फोटाला पसंती देत, या जोडीला शुभेच्छाही दिल्या आहेत.
फोटो मागचे सत्य
दरम्यान अभिनेत्रीने फोटोवर ‘सर सुखाची श्रावणी…’हे गाणं लावलं आहे. मात्र, कॅप्शनमध्ये कसलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे दोघांचं खरंच लग्न आहे की, आगामी नव्या कोणत्या चित्रपटातील हा फोटो आहे याबाबत अजून काहीच खुलासा झालेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात असल्याप्रमाणे या फोटोचं सत्य तेच राहणार की या फोटोमागची वेगळीच कहाणी समोर येऊन चाहत्यांचा हिरमोड होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र फोटोमधील राजेश्वरीची साडी आणि सोमनाथची वेशभूषा सध्यातरी सर्वांचे लक्ष वेधत आहेत.