मुंबई : बुलेट ही एक अशी गाडी आहे ज्याचं स्वप्न प्रत्येकजण बघतो. या स्वप्नाला वयाची किंवा अन्य कोणतीही सीमा नसते. याच गोष्टीचा विचार करत आगामी मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या निर्मात्यांनी प्रेमाच्या महिन्यात आपल्या खास प्रेक्षकांना त्यांची स्वप्नवत बुलेट भेट देण्याचं आयोजन केलंय. ‘लॉ ऑफ लव्ह’ (low of love) हा सिनेमा बघायला जा त्याचं तिकीट दाखवा आणि आपली हक्काची बुलेट घरी घेऊन जा, अशी ही ऑफर आहे.
प्रेमाचा नवा अर्थ उलघडण्यासाठी येत्या ४ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ‘लॉ ऑफ लव्ह’ हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाचं औचित्य साधत निर्माते आणि अभिनेता जे. उदय यांनी ही भन्नाट संकल्पना योजली आहे. आपल्या प्रियजनांसोबत हा चित्रपट बघायला या आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा, अशी ही संकल्पना आहे.
‘रॉयल एन्फिल्ड गाडीचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो, पण त्याची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे सर्वानाच ती गाडी घेणे शक्य होत नाही. या लकी ड्रॉ स्पर्धेमार्फत आम्ही तब्बल 50 बुलेट महाराष्ट्रातील आपल्या रसिक प्रेक्षकांना देऊ इच्छित आहोत. याने त्यांचा व्हॅलेंटाईन आणखीच खास होईल याची आम्हाला खात्री आहे.’ असं अभिनेते आणि निर्माते जे. उदय यांनी म्हटलंय.
वेदिका फिल्म क्रिएशननिर्मित ‘लॉ ऑफ लव्ह’ येत्या 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री शालवी शाह या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच अभिनेते जे. उदय यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात ते अभिनय करताना देखील पहायला मिळणार आहे. याचबरोबर या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आम्ही यशस्वी होऊ’, असं या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात आलं. त्यामुळे या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या