आई झाल्यानंतर दीपिकाची झाली अशी अवस्था; म्हणाली ‘अपुरी झोप, थकवा, ताण..’
मुलीच्या जन्मानंतर रणवीर आणि दीपिकाने इन्स्टाग्रामवर ‘बेबी गर्लचं स्वागत’ अशी पोस्ट लिहित त्याखाली जन्मतारखेचा उल्लेख केला होता. या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दीपिका सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. मात्र इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ती तिचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका तिच्या बाळंतपणाच्या आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे. बाळंतपणात तिला विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. यामुळे निर्णयक्षमतेवर अधिक परिणाम होत असल्याचं तिने म्हटलंय. बाळंतपणात अपुरी झोप, प्रचंड थकवा आणि ताण या समस्यांचा दीपिकाला सामना करावा लागतोय.
याविषयी दीपिका म्हणाली, “जेव्हा तुमची झोप पूर्ण झालेली नसते किंवा तुमचं शरीर खूप थकलेलं असतं किंवा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमच्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. मला स्वत:ला याची जाणीव झाली आहे. मला माहितीये, जेव्हा माझी झोप पूर्ण झालेली नसते, मी खूप थकलेली असते किंवा माझं सेल्फ केअर रुटीन मी पाळू शकत नाही तेव्हा माझ्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होतो.” यावेळी दीपिका नकारात्मक भावनांविषयीही व्यक्त झाली. लोक नकारात्मक भावनांना पार कुरवाळतात, असं ती म्हणाली.
View this post on Instagram
“वेदना, राग आणि मनातील भावना उफाळून येणं हे पूर्णपणे सामान्य आहे. त्यातून आपण शिकत पुढे गेलं पाहिजे. तुमच्यावर होणाऱ्या टीकेचा तुम्ही कशा पद्धतीने सामना करता, त्याकडे तुम्ही सकारात्मकतेने कसं पाहता आणि स्वत:वर कसं काम करता, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा आणि संयम बाळगा”, असा सल्ला तिने चाहत्यांना दिला. दीपिकाने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिकाने 2018 मध्ये इटलीत लग्न केलं.
आई झाल्यानंतर दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायो बदलला आहे. तिच्या बायोमधील या नव्या मजकूराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आई बनल्यानंतर दीपिकाचं आयुष्य कसं सुरू आहे, हे मजकूर वाचल्यानंतर लक्षात येतं. ‘फीड, बर्प, स्लीप, रीपिट’ असं तिने लिहिलंय. बाळाच्या रुटीनचं वर्णन करणारा हा बायो आहे.
दीपिका आणि रणवीर लवकरच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी दीपिकाच्या अनुपस्थितीबद्दल विचारलं असता रणवीर म्हणाला, “दीपिका तर बाळासोबत व्यस्त आहे. त्यामुळे ती येऊ शकली नाही. माझी ड्युटी रात्रीची आहे, म्हणून मी आता येऊ शकलो.”