‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’चा प्रोमो पाहून पोट धरून हसाल! भाऊ कदम-ओंकार भोजनेची धमाल कॉमेडी
निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदाचे तीन हुकमी एक्के एकत्र येत आहेत. पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला ते सज्ज झाले आहेत.
“हसताय ना? हसायलाच पाहिजे” असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन घेऊन आला आहे. निलेशच्याच गाजलेल्या डायलॉगवरून या शोचं नाव ठेवण्यात आलं आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. शोची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत काही टीझर आणि प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता एका या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोत ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. अभिनेते भरत जाधव आणि अलका कुबल यादेखील ओंकार आणि भाऊ यांच्या विनोदावर खळखळून हसत आहेत. या स्किटमध्ये हे दोघंही स्त्रियांचं पात्र साकारत असून त्यांच्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला भाग पाडल्याचं दिसतंय. त्यामुळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
View this post on Instagram
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचं लेखन आणि दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनीच केलं आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण या कलाकारांचा देखील समावेश आहे. येत्या 27 एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री 9 वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कॉमेडी शोचे एपिसोड्स प्रेक्षक जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहू शकतात.
सलग दहा वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर निलेश साबळे हे मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या नव्या शोमध्ये महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.