अनंत-राधिकाच्या लग्नानंतर नीता अंबानी यांनी हात जोडून मागितली माफी; कारण काय?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा शुक्रवारी रात्री पार पडला. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा आहे. देश-विदेशातील मान्यवर या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. रिसेप्शननंतर खुद्द नीता अंबानी माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी हात जोडून माफी मागितली.
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि मोठे व्यावसायिक वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांनी शुक्रवारी रात्री मुंबईतल्या ‘जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर’ याठिकाणी धूमधडाक्यात लग्न केलं. ‘वेडिंग ऑफ द इअर’ म्हणून संबोधल्या गेलेल्या या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे अनेक बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली. शुक्रवारी लग्नानंतर शनिवारी ‘शुभ आशीर्वाद’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजकीय, क्रीडा, चित्रपट यांसोबतच इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनंत आणि राधिकाच्या रिसेप्शननंतर आता नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या हात जोडून माफी मागताना दिसत आहेत.
अनंत-राधिकाच्या रिसेप्शनदरम्यान नीता अंबानी यांनी बाहेर येऊन पापाराझी आणि माध्यमांची भेट घेतली. यावेळी त्या हात जोडून म्हणाल्या, “तुम्ही सर्वजण इतक्या दिवसांपासून अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी येत आहात. तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. हे लग्नाचं घर आहे आणि तुम्ही आमच्या जल्लोषात सहभागी झाला आहात. तुम्ही दाखवलेल्या संयम आणि समजुतदारपणासाठी मी तुमची कृतज्ञ आहे. लग्नाचं घर असल्याने आमच्याकडून काही चूक-भूल झाली असेल तर माफ करा.”
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विविध व्हिडीओंमध्ये नीता अंबानी या लग्नाला आलेल्या पाहुण्यांची आवर्जून विचारपूस करताना दिसल्या. लग्नापूर्वी जेव्हा अँटिलियामध्ये शिव-शक्तीच्या पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हासुद्धा त्या बाहेर येऊन माध्यमांसोबत आणि पापाराझींसोबत संवाद साधताना दिसल्या. “तुम्ही सर्व ठीक आहात ना? मी तुम्हा सर्वांसाठी पुजेचा प्रसाद पाठवते”, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या विनम्र स्वभावाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. इतके श्रीमंत असूनही त्यांनी मुलाच्या लग्नात प्रत्येकाच्या पाहुणाचाराची विशेष काळजी घेतली आणि प्रत्येकाशी ते अत्यंत प्रेमळ वागले, असं नेटकरी म्हणतायत.
अमिताभ आणि जया बच्चन, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, शाहरुख आणि गौरी खान, तमिळ सुपरस्टार रजनीकांत, हॉलिवूड अभिनेता आणि डब्ल्युडब्ल्युई फेम जॉन सीना, सलमान खान, संजय दत्त, अर्जुन कपूर, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर-आलिया भट्ट, विकी कौशल-कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा-निक जोनास, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, बाबा रामदेव, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांसह इतर अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.