मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला. देसाई यांनी टोकाचा निर्णय घेतल्यानंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलिस कसून चौकशी करत आहेत. आता नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणामधील आरोपी रशेस शाहा आणि इतरांचे फोन बंद असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच आरोपी घरात आणि कार्यालयातही नसल्याचं समोर आलं आहे.
नितीन देसाई यांच्या निधनाची चौकशी सुरु असताना, संबंधीत प्रकरणातील आरोपी का फरार झाले? त्यांनी फोन का बंद केला? नितीन देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या गंभीर आरोप सत्य आहेत का? असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत. सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या मृत्यूची आणि प्रकरणातील आरोपींची चर्चा रंगच आहे.
नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनी कडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण घेतलेल्या कर्जावरील व्यज वाढत कर्ज तब्बल २५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोतलं होतं. दरम्यान, कोरोना महामारी आल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणं नितीन देसाई यांच्यासाठी कठीण झालं होतं. म्हणून आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं अशी माहिती समोर आली.
मानसिक त्रास होत असल्यामुळे नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला असं देखील त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. जीवन संपवण्याआधी त्यांनी काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स केले होते. त्यात चार जणांची नाव आहेत. याप्रकरणी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.
नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या आहेत. प्रचंड मोठा डेटा त्यांनी निधनापूर्वी स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी स्वतःचा जीवनप्रवास, एनडी स्टुडीओचा प्रवास, आलेल्या संकटांबद्दल ऑडिओमध्ये सांगितलं आहे. पण इतर कोणावरही आरोप न करता त्यांनी फक्त एडलवाईज कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
अशात एडलवाईज कंपनीचे अधिकारी फरार असल्यामुळे नक्की सत्य काय? याची चर्चा रंगत आहे. सरकारने एडलवाईज कंपनीच्या ताब्यात एनडी स्टुडिओ जावू देवू नये अशी मागणी केली आहे. अनेक मेहनती कलाकारांना नवीन व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न सरकारने या स्टुडिओच्या माध्यमातून करावा. असं भावनिक आवाहन नितीन देसाई यांनी ऑडिओच्या माध्यमातून केलं.