Nitin Desai | नितीन देसाई यांच्या मृत्यूचं गूढ; ऑडिओ क्लिपमध्ये अभिनेत्याचं नाव, कोण आहे तो?
कर्ज देणाऱ्या कंपनीला एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. त्याऐवजी राज्य सरकारनं स्टुडिओचा ताबा घेऊन त्याची देखभाल करावी, अशी विनंती देसाई यांनी त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये केली.
मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. गुरुवारी रायगड पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांची चौकशी केली. यात त्यांची पत्नी आणि एनडी स्टुडिओतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी 10 ते 11 क्लिप्समध्ये आपलं व्हॉईस रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगमधून महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. कर्ज घेतलेल्या एडलवाईज कंपनीच्या वरिष्ठांवर त्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. याप्रकरणी एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. याचसोबत या व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी एका अभिनेत्याचाही उल्लेख केला.
नितीन देसाई यांचे ऑडिओ क्लिप्स फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई हे लॉबिंगचा शिकार झाले होते. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी चार जणांची नाव घेतली आहेत. याच चार जणांमध्ये एका अभिनेत्याचाही समावेश आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओवर बहिष्कार टाकल्याचाही उल्लेख केला आहे. त्याचसोबत याचाही खुलासा झाला आहे की एका मोठ्या समूहाने देसाई यांच्या स्टुडिओवर बहिष्कार टाकला होता. या मोठ्या ग्रुपशी निगडीत काही कलाकारांचीही नावं समोर येत आहेत.
नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना कुणी फसविण्याचा प्रयत्न केला का किंवा त्यांचा स्डुडिओ ताब्यात घेण्याचा कुणी प्रयत्न करत होते का, तसंच त्यांना दिलेल्या कर्ज वसुलीत नियमबाह्य व्याज आकारणी झाली का, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. देसाई यांचा स्टुडिओ जतन करण्याबाबत कायदेशीर मत घेण्यात येईल. रशेष शाह आणि एआरसी एडलवाईज कंपन्यांचीसुद्धा चौकशी केली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
‘कर्ज देणाऱ्या कंपनीला स्टुडिओचा ताबा देऊ नये’
कर्ज देणाऱ्या कंपनीला एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. त्याऐवजी राज्य सरकारनं स्टुडिओचा ताबा घेऊन त्याची देखभाल करावी, अशी विनंती देसाई यांनी त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी ही विनंती केली आहे.
नितीन देसाई यांच्या एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडने एडेलवाईज समूहातील ईसीएल फायनान्सकडून 2016 आणि 2018 असे दोन टप्प्यांत एकूण 181 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गोतं. 31 मार्च 2022 आणि 9 मे 2022 अशा अनुक्रमे या दोन मुदत कर्जाच्या परतफेडीच्या अंतिम तारखा होत्या. त्या पाळल्या न गेल्याने कर्ज बुडीत खात्यात अर्थात एनपीए म्हणून वर्ग केलं होतं.