Nitin Desai यांचं ‘या’ठिकाणी होणार अंत्यदर्शन; पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
चाहते, सेलिब्रिटी यांना आज घेता येणार नितीन देसाई यांचं अत्यंदर्शन; कलाविश्वावर शोककळा... कलादिग्दर्शकाच्या निधनामुळे इंडस्ट्रीचं मोठं नुकसान
मुंबई | ४ ऑगस्ट 2023 : बुधवारी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ५८ व्या वर्षी कलादिग्दर्शक यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मराठी, हिंदी सिनेविश्वात स्वतःचा ठसा उमटवणारे नितीन देसाई यांची एक्झिट थक्क करणारी आहे. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पण चाहते, सेलिब्रिटी आणि कुटुंबियांना आज नितीन देसाई याचं अत्यंदर्शन होणार आहे.
शुक्रवार म्हणजे आज सायंकाळी ४ वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर एनडी स्टुडीओमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
नितीन देसाई यांच्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी मुंबई याठिकाणी जेजे रुग्णालयात आणण्यात आलं होतं. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये स्वतःला संपवलं. निधनानंतर चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचं कारण गळफास असल्याचं समोर येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टुडिओमध्ये असलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांचा केअरटेकर आणि ड्रायव्हरची चौकशी केली आहे.
बुधवारी सकाळी ९ वाजता नितीन देसाई यांचा मृतदेह आढळून आल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांना नितीन यांच्या मोबाईलमधून एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे. त्यात ४ जणांचा उल्लेख आहे. या चार जणांच्या दबावाखाली नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. लवकरच त्यांचा जबाब नोंदवला जाईल. असं देखील सांगण्यात येत आहे.
नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक विवंचनेत अडकल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे.
नितीन देसाई यांनी १९८९ मध्ये ‘परिंदा’ सिनेमातून त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनाची भूमिका बजावली. एवढंच नाहीतर, ‘देवदास’, ‘खामोशी’ सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.