Nitin Desai | ‘पाऊले चालती पंढरीची वाट…’, म्हणत नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीवर केले गंभीर आरोप
नितीन देसाई यांच्या ऑडिओची सुरुवात 'लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार', तर शेवट 'पाऊले चालती पंढरीची वाट...', एडलवाई कंपनीवर केले गंभीर आरोप, सरकारला केलं भावनिक आवाहन
मुंबई | ४ ऑगस्ट 2023 : दिग्गज कालदिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे. पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. पण आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं. नितीन देसाई यांनी एडलवाई कंपनी आणि कंपनीच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. सध्या निधनापूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.
नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या आहेत. प्रचंड मोठा डेटा त्यांनी निधनापूर्वी स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी स्वतःचा जीवनप्रवास, एनडी स्टुडीओचा प्रवास, आलेल्या संकटांबद्दल ऑडिओमध्ये सांगितलं आहे. पण इतर कोणावरही आरोप न करता त्यांनी फक्त एडलवाईज कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
ऑडिओ क्लिपमध्ये एडलवाईच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. ऑडिओची सुरुवात त्यांनी लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार अशी केली असून शेवट पाऊले चालती पंढरीची वाट असा केला आहे. ऑडिओमध्ये मधल्या काळात त्यांनी एडलवाईच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.
सरकारने एडलवाईज कंपनीच्या ताब्यात एनडी स्टुडिओ जावू देवू नये अशी मागणी केली आहे. अनेक मेहनती कलाकारांना नवीन व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न सरकारने या स्टुडिओच्या माध्यमातून करावा. असं भावनिक आवाहन नितीन देसाई यांनी ऑडिओच्या माध्यमातून केला आहे.
धनुष्यबाणाच्या प्रतिकृतीचा अर्थ काय? याचा उल्लेख देखील क्लिपमध्ये करण्यात आला आहे. एनडी स्टुडिओचं शिवधनुष्य उचललं पण आता ते खाली ठेवण्याची वेळ आली.. एवढंच नाही तर, त्यांना मानसिक त्रास झाला असल्याचा… उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पण एडलवाई कंपनीवर जे आरोप करण्यात आले आहेत, त्यावर पोलीस चौकशी करत आहेत. कंपनीच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौकशीत काही आढळल्यास गुन्हा देखील दाखल होवू शकतो… अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.