Nitin Desai यांनी उभारला स्वतःच्या मृत्यूचा सेट; निधनापूर्वीच्या चिठ्ठीमध्ये व्यक्त केली शेवटची इच्छा
सिनेमांच्या शुटिंगसाठी उभारण्यात आलेल्या स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी तयार केला स्वतःच्या मृत्यूचा सेट; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये व्यक्त केली शेवटची इच्छा
मुंबई | ४ ऑगस्ट 2023 : कलादिर्गर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी स्वतःला संपवलं. स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी शेवटचा श्वास घेतला. पण सिनेमांच्या शुटिंगसाठी उभारण्यात आलेल्या स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःसाठी मृत्यूचा सेट तयार केला. एवढंच नाही तर, नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये शेवटची इच्छा व्यक्त केली. आर्थिक विवंचनेत अडकल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे. सध्या नितीन देसाई यांच्या निधनाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार; सिनेमांच्या भव्य सेटवर नितीन देसाई यांनी स्वतःच्या मृत्यूचा देखील सेट तयार केल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. एनडी स्टुडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या मयूर याने याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. स्वतःचं जीवन संपवण्यापूर्वी नितीन देसाई यांनी मोठा धनुष्यबाण तयार केला. या धनुष्यबाणाला लटकून त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांनी ऑडिओ क्लिप देखील सापडल्या आहेत. पण नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये शेवटची इच्छा व्यक्त केली. स्टुडीओमध्ये काम करणारा माजी कर्मचारी सचिन मोरे याने महत्त्वाची माहिती दिली आहे. जेव्हा सचिन याला नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल कळलं. तेव्हा तो घटनास्थळी दाखल झाला.
सचिन याला नितीन देसाई यांच्या मृतदेहा बाजूला एक चिठ्ठी आढळली. चिठ्ठीमध्ये नितीन देसाई यांनी ‘माझं अंत्यसंस्कार स्टुडिओमध्येच करा..’ असं लिहीलं आहे. नितीन देसाई यांनी मोठ्या कष्टाने आणि संघर्षाने एनडी स्टुडीओची स्थापना केली होती. एनडी स्टुडीओवर नितीन देसाई यांचं प्रचंड प्रेम होतं. आज सायंकाळी ४ वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टुडिओमध्ये असलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी नितीन देसाई यांचा केअरटेकर आणि ड्रायव्हरची चौकशी केली आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता नितीन देसाई यांचा मृतदेह आढळून आल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांना नितीन यांच्या मोबाईलमधून एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे.
नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक विवंचनेत अडकल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे.