Nitin Desai | “जगणं असह्य झालंय..”; पत्नीसमोर नितीन देसाई यांनी केलं होतं मन मोकळं, अश्रूही अनावर
नितीन देसाई यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. देसाई हे याविषयी कोणाकडेच व्यक्त व्हायचे नाहीत, अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी आणि जवळच्या सहकाऱ्यांनी दिली. मात्र पत्नीसमोर त्यांनी याविषयी एकदा मन मोकळं केलं होतं.
अलिबाग | 5 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाचं डोंगर आणि फसलेलं आर्थिक नियोजन यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. आत्महत्येपूर्वी देसाई यांनी काही ऑडिओ क्लिप्सद्वारे आपलं मनोगत मांडलं होतं. हे ऑडिओ क्लिप्स सध्या पोलीस तपासून पाहत आहेत. तर दुसरीकडे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी शुक्रवारी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ईसीएल फायनान्स कंपनी एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्जप्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा आऱोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. यावेळी नोंदवलेल्या जबाबात त्यांनी बरेच खुलासे केले आहेत.
“2004 मध्ये कर्जतच्या हातनोली नाका इथं एनडी स्टुडिओची स्थापना केल्यानंतर स्टुडिओच्या कामकाजासाठी आम्ही सुरुवातीला अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड आम्ही मुदतीत केली होती. त्यानंतर आम्ही स्टुडिओच्या कामाकरता आवश्यकतेनुसार कर्ज घेतलं आणि त्याचीदेखील मुदतीत परतफेड केली होती. त्यामुळे माझे पती नितीन देसाई यांचा कर्ज घेऊन फसवण्याचा कधीच हेतू नव्हता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
नितीन देसाई यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. फक्त त्यांच्या कुटुंबीयांना त्याविषयीची माहिती होती. देसाई हे याविषयी कोणाकडेच व्यक्त व्हायचे नाहीत, अशी प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी आणि जवळच्या सहकाऱ्यांनी दिली. मात्र पत्नीसमोर त्यांनी याविषयी एकदा मन मोकळं केलं होतं.
त्याविषयी सांगताना नेहा पुढे म्हणाल्या, “माझे पती त्यांच्यावर असलेल्या मानसिक दडपणामुळे घरामध्ये कोणाशी काहीच बोलत नव्हते. गप्प राहणं किंवा कधीही चिडचिडेपणा करणं असा बदल त्यांच्या स्वभावात होऊ लागला. यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा घरात फक्त आम्ही दोघंच होतो, तेव्हा ते माझ्यासमोर रडले. हे लोक माझ्या स्वप्नातील स्टुडिओ गिळंकृत करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मला जीवन जगणं असह्य झालं आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. मी माझ्या पतीला वारंवार धीर देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एडलवाईज कंपनीकडून कोणत्याही पद्धतीचा सहकार्य आम्हाला आतापर्यंत झालं नाही.”
“माझे पती फायनान्स कंपनीचं कर्ज फेडण्याची तयारी दाखवत होते. असं असूनही केवल मेहता, रशेष शहा, स्मित शहा, कंपनीचे आर. के. बंसल आणि प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी स्टुडिओच्या कर्जाच्या वसुलीसाठी माझ्या पतीला प्रचंड मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी इच्छा नसतानाही आत्महत्या केली,” असे आरोप नेहा देसाई यांनी केले.