मुंबई : अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकताच एका मॉलमध्ये वाईट अनुभव आला. हा अनुभव त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहत्यांना सांगितला. त्याचसोबत एक सेलिब्रिटी म्हणून नाही तर सर्वसामान्य ग्राहक म्हणून योग्य वागणूक मिळणं हा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. निवेदिता यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मॉलमधील कर्मचाऱ्यांविरोधात राग व्यक्त केला आहे. नुकत्याच त्या मालाडमधल्या एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र मॉलमधील एका कपड्यांच्या दुकानात त्यांना योग्य वागणूक दिली गेली नाही. म्हणूनच त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याविरोधात तक्रार केली आहे.
‘मी मालाडच्या इन्फिनिटी मॉलमधील मॅक्स स्टोअरमध्ये गेले होते. त्या स्टोअरमधील कर्मचाऱ्यांकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली. तिथला माझा अनुभव अजिबात चांगला नव्हता. तुम्ही काय खरेदी करत आहात याकडे त्यांच्या कर्मचाऱ्यांचं लक्षच नव्हतं. तिथे मदतीसाठीही कोणी पुढे येत नव्हतं. एक मुलगी आली आणि तिने फक्त दुसऱ्या कर्मचाऱ्याला सांगितलं की तिच्याकडे वेळ नाही. ती तिथून थेट निघून गेली. जेव्हा दुसऱ्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला बोलावलं’, असा अनुभव त्यांनी सांगितला.
याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, ‘मी सेलिब्रिटी आहे म्हणून मला चांगली वागणूक नकोय पण सर्वसामान्य ग्राहक म्हणून मला योग्य वागणूक आहे. स्टोअरमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा तो हक्क आहे.’ निवेदिता यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत स्टोअरविरोधात राग व्यक्त केला.
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंटमध्ये लिहिलं, ‘खरंय’. तर काहींनी त्यांच्यासोबतही असंच काहीसं घडल्याचं सांगितलं. काही नेटकऱ्यांनी निवेदिता यांना संबंधित ब्रँडवर बहिष्कार टाकण्याचाही सल्ला दिला. निवेदिता सराफ या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मालिकेत काम करतानाच त्या स्वत:च्या युट्यूब चॅनलसाठी विविध व्हिडीओ शूट करत असतात. याशिवाय त्यांचा साड्यांचाही व्यवसाय आहे. त्यांच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘भाग्य दिले तू मला’ या मालिका चांगल्याच गाजल्या आहेत.