कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 4 एप्रिलपासून ‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya Dile Tu Mala) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यामध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांची झलक पहायला मिळाली. ‘अग्गंबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) या मालिकेनंतर त्या पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. “त्याला नाविन्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास, कसा होईल त्यांचा एकत्र प्रवास,” असं म्हणत परस्परविरोधी भूमिकांची ओळख या प्रोमोतून करून दिली आहे. या मालिकेत निवेदिता या रत्नमाला ही व्यक्तीरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत विवेक सांगळे, तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
या मालिकेविषयी निवेदिता सराफ म्हणाल्या, “तीन पात्रांभोवती फिरणार्या या कथानकात ‘रत्नमाला’ या पात्राचं ठाम असं स्वत:चं मत, स्वत:चे विचार आहेत. खूपच वेगळी भूमिका आहे आणि म्हणूनच मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. रत्नमालाने स्व:बळावर स्वत:च विश्व निर्माण केल आहे. तिने इथवरची वाटचाल आपल्या परंपरा, संस्कृतीला घट्ट धरूनच केली आहे. परंतु याउलट राजवर्धन आहे आणि इथेच दोन पिढींमधील विचारांमध्ये खटके उडत आहेत. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहेच पण दोघेही आपल्यापल्या मतांवर ठाम आहेत. या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो आणि म्हणूनच रत्नमालाला अशी मुलगी घरात सून म्हणून हवी आहे जी तिचंच प्रतिबिंब आहे. जिच्या मदतीने ती आपल्या मुलाला सुधारू शकेल. कारण, आज आपण प्रत्येक घरामध्ये हे होताना बघतो. माझं यावर एकंच म्हणणं आहे जुन्या लोकांचा अनुभव घ्या आणि पुढे जा. पण आताच्या मुलांना हे पटत नाही. ही दोन पिढींमधील जी वैचारिक तफावत आहे ती या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.”
निवेदिता यांनी याआधी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत साकारलेली आसावरीची भूमिका चांगलीच गाजली. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. आसावरी आणि रत्नमाला या दोन्ही भूमिकांमध्ये बराच अंतर आहे. त्यामुळे त्यांना पडद्यावर अशा वेगळ्या रुपात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा:
जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले
“डोकं घरी ठेवून आलात वाटतं”; भर पत्रकार परिषदेत पत्रकारावर चिडला जॉन