माझ्या ट्विटमुळे कुठलाही हिंसाचार झाला नाही; कंगना रनौतचा युक्तिवाद
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे दिलेले आदेश अयोग्य असल्याने त्यांचा आदेश व पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा | kangana ranaut
मुंबई: मी केलेल्या ट्वीटमुळे कधीही हिंसा झालेली नाही वा कोणताही गुन्हा घडलेला नाही, असा दावा अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangna Ranaut) वतीने सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी देशद्रोहाच्या आरोपाअंतर्गत कंगनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेत देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. (Kangna Ranaut in Mumbai HC)
आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होणार असून तोपर्यंत न्यायालयाने कंगना व तिची बहीण रंगोली यांना दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे.
कंगनाचे वकील काय म्हणाले?
कंगनाने कोणतेही चुकीचे ट्विट केलेले नाही. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे दिलेले आदेश अयोग्य असल्याने त्यांचा आदेश व पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी केली
गुन्हा नोंदवण्याचा आदेश देताना सारासार विचार करण्यात आलेला नाही. जे कलम लावण्यात आले आहे, त्याअंतर्गत मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्या ट्विटवर लोकांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्याचे हिंसाचारात रुपांतर झाले नाही. त्यामुळे मला शिक्षा होऊ शकत नाही, असे सिद्दिकी यांनी कंगनाच्यावतीने न्यायालयाला सांगितले.
काय आहे वाद?
कंगना रनौत हिने मध्यंतरी बॉलीवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.
पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्र न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
संबंधित बातम्या:
Kangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च
उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही : कंगना रनौत
(Kangna Ranaut in Mumbai HC)