Adipurush | जे थिएटरमध्ये शक्य झालं नाही ते ‘आदिपुरुष’ने युट्यूबवर करून दाखवलं; लीक होताच..

| Updated on: Jul 10, 2023 | 1:01 PM

500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटाला ही रक्कम वसूल करणंही कठीण जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात फक्त 360 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमाईचा मंदावलेला वेग पाहता बजेटची संपूर्ण रक्कम वसूल होणं अवघड दिसत आहे.

Adipurush | जे थिएटरमध्ये शक्य झालं नाही ते आदिपुरुषने युट्यूबवर करून दाखवलं; लीक होताच..
Adipurush
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा फटका बसला. या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला थिएटर रिलीजनंतर मोठा तोटा सहन करावा लागला. दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. कारण ओटीटीची डील होण्याआधीच ‘आदिपुरुष’ हा चित्रपट युट्यूबवर लीक झाला. जे थिएटरमध्ये शक्य नाही झालं ते ‘आदिपुरुष’ने युट्यूबवर करून दाखवलं, असंच म्हणावं लागेल. कारण अवघ्या काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले. मात्र या गोष्टीचा फटका ‘आदिपुरुष’ला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना बसेल हे मात्र नक्की!

शनिवारी ‘आदिपुरुष’ची एचडी प्रिंट युट्यूबवर लीक झाली होती. हा चित्रपट लीक होताच अवघ्या काही तासांतच त्याला 2.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. अद्याप या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर झाली नाही, मात्र त्यापूर्वीच अनेकांनी हा चित्रपट मोफत पाहिला. लीक झाल्याचं कळताच काही वेळानंतर हा चित्रपट युट्यूबवरून हटवण्यात आला.

500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला ही रक्कम वसूल करणंही कठीण जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात फक्त 360 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कमाईचा मंदावलेला वेग पाहता बजेटची संपूर्ण रक्कम वसूल होणं अवघड दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवड्यांनी लेखक मनोज मुंतशीर यांनी शनिवारी सकाळी ट्विट करत सर्वांची माफी मागितली.

हे सुद्धा वाचा

मनोज मुंतशीर यांनी ट्विटमध्ये लिहिलं, ‘मी स्वीकार करतो की आदिपुरुष या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी तुम्हा सर्व भाऊ-बहिणींची, मोठ्यांची, पूज्य साधू-संतांची आणि श्रीराम यांच्या भक्तांची हात जोडून विनाशर्त माफी मागतो. भगवान बजरंग बलीची कृपा आपल्या सर्वांवर असू दे. आपल्याला एकत्र आणि अतूट राहून पवित्र सनातन आणि महान देशाची सेवा करण्यासाठी शक्ती देवो.’

उच्च न्यायालयानेही सुनावलं

आदिपुरुष या चित्रपटाचा विरोध केवळ प्रेक्षकांकडून झाला नाही. तर हायकोर्टाकडूनही निर्माते-दिग्दर्शकांवर ताशेरे ओढले गेले. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देणं ही सर्वांत मोठी चूक असल्याचं म्हणत अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने निर्मात्यांना फटकारलं होतं. इतकंच नव्हे तर हायकोर्टाने चित्रपट निर्मात्यांना सर्व धार्मिक ग्रंथ आणि महाकाव्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. कुराण आणि बायबललाही हात लावू नका, असं कोर्टाने सांगितलं.