OMG 2 | ‘जे डोकं आदिपुरुषसारख्या हास्यास्पद चित्रपटाला..’; ‘ओह माय गॉड 2’ अभिनेत्याने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं
'जे डोकं सेन्सॉर बोर्डाने आदिपुरुषसारख्या हास्यास्पद चित्रपटाला प्रमाणपत्र देताना लावलं पाहिजे होतं, ते त्यांनी 'OMG 2'सारख्या विचारपूर्वक आणि पुरोगामी चित्रपटातील सीन्स काटछाट करण्यात खर्च केलं आहे. वाह!', अशी उपरोधिक टिका त्यांनी केली.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाला समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. ‘गदर 2’सारख्या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होऊनही प्रेक्षक-समीक्षक ‘OMG 2’चं कौतुक करत आहेत. या चित्रपटाला सुरुवातीला विरोधाला सामोरं जावं लागलं होतं, कारण सेक्स एज्युकेशनसारखा मुद्दा यातून मांडण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटात वीसहून अधिक बदल सुचवले आणि त्याला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं. सेक्स एज्युकेशनचा मुद्दा किशोरवयीन मुलांसाठी किती महत्त्वाचा असूनही त्याच वर्गाला चित्रपट पाहण्यापासून वंचित ठेवलं, यावरून तीव्र नाराजी काही कलाकारांकडून व्यक्त झाली. आता ‘OMG 2’मधील अभिनेते गोविंद नामदेव यांनी सेन्सॉर बोर्डावर सडकून टीका केली आहे. ‘आदिपुरुषसारख्या हास्यास्पद चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाने जे केलं पाहिजे होतं, ते त्यांनी ओह माय गॉड 2 सारख्या विचारपूर्वक बनवलेल्या चित्रपटाबाबत केलं’, असं ते म्हणाले.
गोविंद नामदेव यांनी 2012 मधील ‘ओह माय गॉड’ आणि आता प्रदर्शित झालेल्या ‘OMG 2’मध्येही भूमिका साकारली आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून त्यातून त्याने सेन्सॉर बोर्डावर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलं, ‘ओह माय गॉड 2 हा चित्रपट अखेर सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या 24 कट्ससह आणि अ प्रमाणपत्रासह प्रदर्शित झाला आहे. जेणेकरून ज्या किशोरवयीन मुलांसाठी हा चित्रपट बनवला आहे, त्यांनीच तो पाहू नये.’
‘जे डोकं सेन्सॉर बोर्डाने आदिपुरुषसारख्या हास्यास्पद चित्रपटाला प्रमाणपत्र देताना लावलं पाहिजे होतं, ते त्यांनी ‘OMG 2’सारख्या विचारपूर्वक आणि पुरोगामी चित्रपटातील सीन्स काटछाट करण्यात खर्च केलं आहे. वाह!’, अशी उपरोधिक टिका त्यांनी केली. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील सीन्स, संवाद आणि कलाकारांचा लूक यावरून बराच आक्षेप घेण्यात आला होता.
या पोस्टच्या अखेरीस गोविंद नामदेव यांनी सेन्सॉर बोर्डाला पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. ‘सेन्सॉरने आपली चूक सुधारून समाजाच्या किशोरवयीन मुलांसाठी सकारात्मक क्रांती घडवून आणण्यासाठी किमान UA प्रमाणपत्र दिलं तर हे एक शहाणपणाचं पाऊल असेल. आज थिएटरमधील प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगतोय. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.’