Paul Haggis: ऑस्कर विजेते दिग्दर्शक पॉल हॅगीस पोलिसांच्या ताब्यात; लैंगिक अत्याचाराचा आरोप
कॅनेडियन असलेले 69 वर्षीय पॉल हे एका चित्रपट महोत्सवानिमित्त इटलीला गेले होते. इटलीतील ओस्तुनी याठिकाणी मंगळवारपासून हा महोत्सव सुरू होणार आहे. त्या आधीच पॉल यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
प्रतिष्ठित ऑस्कर (Oscar) पुरस्कार विजेते दिग्दर्शक पॉल हॅगीस (Paul Haggis) यांना रविवारी दक्षिण इटलीमधून ताब्यात घेण्यात आलं. पॉल यांच्यावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त इटालियन माध्यमांनी स्थानिक सरकारी वकिलांच्या हवाल्याने दिलं. कॅनेडियन असलेले 69 वर्षीय पॉल हे एका चित्रपट महोत्सवानिमित्त इटलीला गेले होते. इटलीतील ओस्तुनी याठिकाणी मंगळवारपासून हा महोत्सव सुरू होणार आहे. त्या आधीच पॉल यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. ‘ला प्रेसी’ आणि इतर अनेक इटालियन माध्यमांनी ब्रिंडिसी या शहरातील सरकारी वकिलांकडून मिळालेल्या विधानावरून हे वृत्त दिलंय. एका परदेशी महिलेला तिच्या संमतीविरोधात दोन दिवस लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पॉल यांच्या वकील प्रिया चौधरी यांनी सांगितलं की, “इटालियन कायद्यानुसार ते पुराव्याविषयी बोलू शकत नसले तरी मला खात्री आहे की हॅगीस यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले जातील. ते पूर्णपणे निर्दोष आहेत आणि अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्यात तयार आहेत, जेणेकरून सत्य लवकरच सर्वांसमोर येईल.” पॉल यांनी लैंगिक संबंधानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी महिलेला वैद्यकीयदृष्ट्या काळजी घेण्यास भाग पाडलं, असं तपास करणारे अँटोनियो निग्रो आणि लिव्हिया ऑर्लेंडो यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. पीडित महिलेची शारीरिक आणि मानसिक स्थिती योग्य नसतानाही तिला पॉल यांनी रविवारी ब्रिंडिसी विमानतळावर नेऊन सोडलं, असंही त्यांनी म्हटलंय. विमानतळावरील कर्मचारी आणि पोलिसांना संबंधित महिलेची स्थिती अयोग्य वाटल्याने त्यांची तिची चौकशी केली आणि त्यानंतर ब्रिंडिसी पोलिसांकडे ते घेऊन गेले.
पॉल हे दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी 2006 मध्ये ‘क्रॅश’ या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. पॉल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.