Raanbaazar: ‘रानबाजार’च्या सक्सेस पार्टीत सेलिब्रिटींची धमाल; सीरिजमुळे सबस्क्राइबर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ
कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेब सीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली.
अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ (Raanbaazar) या वेब सीरिजने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेब सीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली. प्लॅनेट मराठी (Planet Marathi), अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजित पानसे, अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले. सबस्क्राइबर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. टिझर बघून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांनी वेब सीरिज पाहून त्याचं भरभरून कौतुक केलं. या वेब सीरिजच्या टीमने आपल्या या यशाचं नुकतंच धुमधडाक्यात सेलिब्रेशन (Success Party) केलं.
हा योगायोग जुळून आला ‘रानबाजार’चे निर्माता आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
वेबविश्वात वादळ आणणाऱ्या या वेब सीरिजचे प्रत्येक आठवड्याला दोन -तीन भाग प्रदर्शित झाल्यानंतर शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आले. पहिल्याच भागात राजकारणातील एका मोठ्या व्यक्तीची हत्या झाल्याचं दिसलं. ही हत्या कोणी केली, हा हनी ट्रॅप आहे की या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे, या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार आहे, रत्ना (प्राजक्ता माळी) आयेशाला का आसरा देते, चारुदत्त मोकाशी ( अभिजित पानसे) या सर्व प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात यशस्वी होणार का, मुख्यमंत्रीपदी कोण येणार, सत्तापालट होणार का, या आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा शेवटच्या दोन भागांत झाला.
या सीरिजमध्ये मोहन आगाशे (मुख्यमंत्री सतीश नाईक), मोहन जोशी (सयाजी पाटील), मकरंद अनासपुरे (पत्रकार दिवेकर ऊर्फ आप्पा), उर्मिला कोठारे (निशा), सचिन खेडेकर (युसूफ पटेल), वैभव मांगले (इन्स्पेक्टर पालांडे), अनंत जोग (रावसाहेब यादव), माधुरी पवार (प्रेरणा सयाजीराव पाटील) या सर्वांनीच आपापल्या भूमिका अगदी चोख साकारल्या आहेत.