Mai: ‘माई’मधील साक्षी तंवरच्या ‘या’ सीनची सोशल मीडियावर का होतेय इतकी चर्चा?
नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'माई' (Mai) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकांमधील लोकप्रिय चेहरा साक्षी तंवर (Sakshi Tanwar) यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. याच सीरिजमधील साक्षीच्या एका दृश्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
आजच्या पिढीची स्त्री एखाद्या क्षेत्रात कितीही पुढे गेली तरी तिचं स्वयंपाकघराशी असलेलं नातं तसंच राहतं. बाई आणि चूल या दोन गोष्टी जणू कायम एकमेकांसाठीच असल्याची वागणूक आजही अनेक घरांमध्ये पहायला मिळते. विशेष म्हणजे यात काहीच चुकीचं नाही, असा आव आणला जातो. असंच एक दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘माई’ (Mai) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकांमधील लोकप्रिय चेहरा साक्षी तंवर (Sakshi Tanwar) यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. याच सीरिजमधील साक्षीच्या एका दृश्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. साक्षीने आजवर ‘कहानी घर घर की’, ‘बडे अच्छे लगते है’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘माई’ या सीरिजमध्ये ती एका आईच्या भूमिकेत आहे. आपल्या मुलीची हत्या का झाली, याचा शोध ती घेत असते.
ज्या दृश्याची सोशल मीडियावर चर्चा होतेय, ते दृश्य स्वयंपाकघरातीलच आहे. मुलीच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी घरात पाहुणे आले असतात. अशा वेळी त्या आईलाच स्वयंपाकघरात जाऊन पाहुण्यांसाठी चहा बनवावा लागतो. आयुष्यातील सर्वांत कठीण काळ असतानाही तिला इतरांचा विचार करून स्वयंपाकघरात काम करावं लागतं, यावर नेटकरी व्यक्त होत आहेत. ‘माईमध्ये एक क्षण असा असतो जेव्हा शीलाला तिच्या स्वतःच्या मुलीच्या शोकसभेत आलेल्या पाहुण्यांसाठी चहा बनवावा लागतो. महिलांकडून आपण कोणत्या प्रकारच्या श्रमाची अपेक्षा करतो याची आठवण करून देणारा हा क्षण होता. तिच्या स्वत:च्या मुलीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यापेक्षा तिला तिच्या पाहुण्यांची सेवा करण्याला प्राधान्य द्यावं लागलं’, अशी ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर अनेकांनी मतं मांडली आहेत. ‘हे दुःखद सत्य आहे, ज्याकडे आपल्यापैकी बहुतेकजण डोळेझाक करतील,’ असं एकाने लिहिलं. ‘असंख्य महिलांचं आयुष्य असंच आहे’, असं दुसऱ्याने म्हटलं.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
Life of a lot of women. pic.twitter.com/QfBqp408BQ
— Asma Azam (@AsmaAzam71) April 23, 2022
‘क्लिन स्लेट फिल्म्स’च्या कर्नेश शर्मा निर्मित या सीरिजचं दिग्दर्शन अंशाई लाल आणि अतुल मोंगिया यांनी केलंय. यामध्ये साक्षीसोबतच सीमा पाहवा, विवेक मुश्रान, वामिका गब्बी, अनंत विधात, रायमा सेन, अंकुर रतन यांच्याही भूमिका आहेत. 15 एप्रिल रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.