‘मिर्झापूर 3’ प्रेक्षकांना का वाटतोय कंटाळवाणा? ही आहेत 5 कारणं
बऱ्याच प्रतीक्षेनंतर 'मिर्झापूर'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र यंदाच्या सिझनने प्रेक्षकांची निराशा केली आहे. हा सिझन कंटाळवाणा असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. त्यामागची कारणं काय आहेत, ते पाहुयात..
गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षक ज्या वेब सीरिजची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेर तो ‘मिर्झापूर 3’ ओटीटीवर प्रदर्शित झाला. अॅमेझॉन प्राइमवर ही सीरिज येताच प्रेक्षकांनी पाहिली आणि सोशल मीडियावर त्यावरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एक-एक तासाचे दहा एपिसोड्स या सिझनमध्ये आहेत. ‘मिर्झापूर’च्या पहिल्या दोन सिझन्सना दमदार प्रतिसाद मिळाला होता. पहिले दोन्ही सिझन हिट ठरल्यानंतर प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनची प्रचंड उत्सुकता होती. अखेर चार वर्षांनंतर निर्मात्यांनी सीरिजमध्ये पुन्हा एकदा तोच माहौल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यंदाचा सिझन पहिल्या दोनसारखा खिळवून ठेवणारा नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या सिझनने काही प्रमाणात प्रेक्षकांची निराशा केली आहे. त्यामागची पाच मोठी कारणं आहेत.
मुन्ना भाईची कमतरता
सीरिज सुरू झाली तेव्हा सर्वाधिक चर्चा मुन्ना भैय्याची झाली होती. यामध्ये त्याची भूमिकासुद्धा तगडी होती. एका मोठ्या बाहुबलीच्या बिघडलेल्या मुलाची भूमिका त्याने साकारली होती. सीरिजमध्ये त्याची वेगळीच दबंगगिरी पहायला मिळाली होती. दिव्येंदु शर्माने मुन्ना भैय्याची भूमिका साकारली होती. मात्र मुन्ना भैय्याच्या भूमिकेचा शेवट मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनमध्येच झाला. त्यामुळे या नव्या सिझनमध्ये ती भूमिका नाही आणि त्याचीच सर्वाधिक कमतरता प्रेक्षकांना जाणवली. कारण या पात्राची स्वत:ची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
कालीन भैय्याची छोटीच भूमिका
यंदाच्या सिझनमध्ये कालीन भैय्याच्या भूमिकेलाही फारसा वाव मिळाला नाही. पूर्वार्धात तर फक्त त्याची झलकच पहायला मिळाली. नंतर त्याचे थोडेफार सीन्स आहेत. मिर्झापूर म्हटलं की फक्त हाणामारीसाठीच प्रेक्षक ही सीरिज पाहत नाहीत. कालीन भैय्या या सीरिजचा प्राण आहे. त्याच्याशिवाय सीरिजचे दहा भाग ओढून ताणून बनवणं खूप आव्हानात्मक होतं. निर्मात्यांनी ही जोखीम का घेतली, हे माहीत नाही.
भावणाऱ्या कलाकारांची कमतरता
गेल्या सिझन्समध्ये लाला आणि रॉबिनच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. यावेळी या दोन पात्रांकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही किंवा अशा नवीन पात्रांची ओळख झाली नाही. यंदा सीरिजमध्ये नवीन असं काहीच दिसलं नाही.
डायलॉग्सची कमतरता
मिर्झापूर या सीरिजमध्ये प्रचंड शिवीगाळ असल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला होता. तरीही पहिल्या दोन सिझनमध्ये डायलॉग्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिसऱ्या सिझनमध्ये संवादावर फारसं काम केलं गेलं नाही.
लांबवलेले एपिसोड्स
हा शेवटचा मुद्दा असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. सीरिजची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरत असतानाच त्याचे एपिसोड्स विनाकारण लांबवले गेले आहेत. ती सीरिज आठ भागांमध्येही बनवता आली असती. त्यामुळे प्रेक्षकांना ही सीरिज काही प्रमाणात रटाळवाणी वाटू शकते.