स्वातंत्र्य दिलंय म्हणून हिंदू धर्माची थट्टा करायची? ‘तांडव’ वेब सीरिजच्या निर्मात्यांवर रवी किशन भडकले
वेब सीरिजला प्रसिद्धी मिळावी यासाठी निर्मात्यांनी हिंदू धर्मावर टीका करण्याचा फार्म्यूला अवलंबला आहे, असा घणाघात रवी किशन यांनी केला (Ravi Kishan slams Tandav makers).
लखनऊ : अॅमेझोन प्राईमच्या ‘तांडव’ या वेब सीरिजवरुन सोशल मीडियावर सुरु झालेला वाद थांबायचं नाव घेताना दिसत नाही. या वेब सीरिजचे निर्माते अली अब्बास जफर यांनी याप्रकरणी माफीदेखील मागितली आहे. मात्र, तरीदेखील लोकांकडून टीकेची झोड सुरुच आहे. उत्तर प्रदेशचे गोरखपूर मतदारसंघाचे खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वेब सीरिजला प्रसिद्धी मिळावी यासाठी निर्मात्यांनी हिंदू धर्मावर टीका करण्याचा फार्म्यूला अवलंबला आहे, असा घणाघात रवी किशन यांनी केला (Ravi Kishan slams Tandav makers).
“मी वेब सीरिज बघितलेली नाही. मात्र, ट्विटरच्या माध्यमातून मला माहिती मिळाली. मी स्पष्टच बोलतो, या वेब सीरिजमध्ये माझ्या काही मित्रांनीदेखील काम केलं आहे. मी समजू शकतो की, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र तुम्ही कोणत्याही धर्मावर टीका करावी, असा त्याचा अर्थ होत नाही. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिदू धर्मियांची थट्टा करावी, असा त्याचा अर्थ होत नाही. हिंदू धर्मासोबत हे वारंवार होतं. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे जास्त वाईट वाटतं”, अशी प्रतिक्रियी रवी किशन यांनी दिली.
“चित्रपटात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. अनेक मुद्द्यांवरुन तुम्ही प्रेक्षकांना आकर्षित करु शकतात. कोणत्याही धर्माला तुच्छ दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार नाही, मग तो कोणताही धर्म असो. मला एक गोष्ट कळत नाही, वारंवार हिंदू धर्म, हिंदू देवता, हिंदू संस्कार, हिंदुत्वाला का टार्गेट केलं जातं?”, असं किशन म्हणाले (Ravi Kishan slams Tandav makers).
“मी आतापर्यंत 650 चित्रपट केले. मात्र, एकाही चित्रपटात मी कोणत्याच धर्मावर टीका केली नाही. वेब सीरिज हिट व्हावी, यासाठी तिला वादाच्या भोवऱ्यात अडकवायचं, असा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. हिदू देवतांवर टीका करणं, हिंदूत्वावर टीका करणं योग्य नाही. या टीकेचा एक हिंदू कलाकार, गोरखपूरचा खासदार म्हणून मला खूप वाईट वाटतं. कारण मनोरंजनाच्या नावाने सहज हिदू धर्माची खिल्ली उडवली जाते. या गोष्टी आता थांबायला हव्यात”, असं मत रवी किशन यांनी मांडलं.
‘तांडव’विरोधात FIR
अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव वेब सिरीज विरोधात अनेक तक्रारी दाखल होत आहेत. सोमवारी अली अब्बास जफरने एक निवेदन काढून हिंदू संघटनांची माफी मागितली आहे. तरीही तांडवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण, आता गौतम बुद्ध नगरातील रबुपुरा पोलिस स्टेशनमध्ये निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा.
निर्मात्याच्या माफीनामा
ही वेब सीरीज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरीजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातमी :
‘तांडव’ विरोधातील ठिय्या आंदोलन पोलिसांनी उधळलं, आमदार राम कदम ताब्यात