गेल्या वर्षभरात कोरियन वेब सीरिज (Korean Series) आणि कोरियन ड्रामा यांनी भारतीय प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात या सीरिजना दाद मिळतेय. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘स्क्वीड गेम’ (Squid Game) ही कोरियन वेब सीरिज जगभरात प्रचंड गाजली. अत्यंत वेगळं कथानक, थरार, कलाकारांचं दमदार अभिनय यामुळे सोशल मीडियावर या सीरिजची जोरदार चर्चा झाली. आता या गाजलेल्या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. गेल्या वर्षी या सीरिजचा पहिला सिझन प्रदर्शित झाला होता. ‘रेड लाइट.. ग्रीन लाइट! स्क्वीड गेमचा दुसरा सिझन येतोय’, अशी पोस्ट लिहित नेटफ्लिक्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यावेळी नेटफ्लिक्सने या सीरिजचे दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक ह्वांग दोंग-ह्युक यांनी चाहत्यांसाठी लिहिलेला एक मजकूरसुद्धा पोस्ट केला. “गेल्या वर्षी स्क्वीड गेमचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी आम्हाला तब्बल 12 वर्षे लागली. पण या सीरिजचा जगभरात लोकप्रिय होण्यासाठी केवळ 12 दिवस लागले. यासाठी मी जगभरातील चाहत्यांचे, प्रेक्षकांचे आभार मानतो. आमच्या सीरिजला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता गी-हु परत येतोय. फ्रंट मॅनसुद्धा परत येतोय. सिझन 2 परत येतोय. दाक्जीसोबत सूटमध्ये असलेला व्यक्तीसुद्धा कदाचित परत येणार आहे. यावेळी तुमची भेट यंग-हीचा बॉयफ्रेंड चोल-सू याच्याशीसुद्धा होईल”, असं दिग्दर्शकांनी लिहिलंय.
या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची घोषणा होताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. दक्षिण कोरियातील काही कर्जबाजारी लोक पैसे मिळवण्यासाठी एका खेळात भाग घेतात. मात्र आपल्या प्राणाच्या बदल्यात हा पैसा मिळणार असल्याचं त्यांना तिथे गेल्यावर कळतं. जो जिंकतो त्याला प्रचंड पैसा मिळतो आणि जो हारतो त्याला त्याचे प्राण गमवावे लागतात. गेल्या वर्षी ही सीरिज प्रदर्शित झाली तेव्हा ही जगभरात सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली होती.