मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा आपल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही मोगल शासकांना जबरदस्तीने खलनायकाच्या रुपात दाखवलं जात आहे. मोगलांनीही चांगलं काम केलं आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना आक्रमक म्हणूनच दाखवलं जातं, असं सांगतानाच मोगल जर एवढे क्रूर आणि विध्वंसक होते तर त्यांनी तयार केलेला ताज महाल आणि लाल किल्ला पाडून टाका, असं धक्कादायक विधान नसीरुद्दीन शहा यांनी केलं आहे. शहा यांनी नव्या वादाला फोडणी दिल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.
ताज डिव्हायडेड बाय ब्लड ही जी-5ची वेब सीरिज येत आहे. यात नसीरुद्दीन शहा सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब शोचा प्रीमियर पुढील महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे धक्कादायक विधान केलं. तसेच तैमूर आणि अकबरामधील फरकही समजावून सांगितला.
लोक सम्राट अकबर आणि हल्लेखोर तसेच आक्रमक नादिर शाह किंवा तैमूरमध्ये फरक सांगत नाहीत. त्याचं मला आश्चर्य वाटतं. हे सर्व मला हस्यास्पद वाटतं. तैमूर लुटमार करायला इथे आला होता. पण मोगल लुटमार करायला आले नव्हते. या भूमीवर बस्तान बसवण्यासाठी ते आले होते. त्यांच्या योगदानाला कोण नाकारू शकतो? असा सवाल नसीरुद्दीन शहा यांनी केला.
काही लोक बोलतात त्यातील काही गोष्टी सत्यही आहेत. मोगलांनी त्यांच्या परंपरांना ग्लोरीफाई केलं होतं. हे सत्यही असेल. पण याचा अर्थ त्यांना व्हिलन करता येणार नाही. त्यांनी जे काही केलं ते भयानकच असेल तर ताजमहल पाडून टाका. लाल किल्ला पाडून टाका. कुतुब मीनार पाडून टाका. आपण लाल किल्ल्याला पवित्र का मानतो? तो तर मोगलांनी बनवला आहे. त्यांचा उदोउदो करण्याची गरज नाही. पण त्यांना किमान व्हिलन तर बनवू नका, असं ते म्हणाले.
मोगल वाईट होते असा विचार करणं म्हणजे देशाच्या इतिहासाबाबतचं आपलं अज्ञान दर्शवतं. त्यांचं महिमामंडन आपल्या पुस्तकातून झालं नसेल. पण त्यांना विध्वसंक म्हणून नाकारणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दुर्देवाने देशातील शाळांमधील इतिहास हा मोगल आणि इंग्रजांवरच आधारीत आहे. आपण लॉर्ड हार्डी, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि मोगल सम्राटांच्या बाबत जाणून होतो. पण आपण गुप्त वंश, मोर्य वंश. विजयनगर साम्राज्य, अजिंठा लेण्यांचा इतिहास किंवा पूर्वेकडील इतिहासाबाबत अनभिज्ञ होतो. आपण या पैकी काहीच वाचलं नाही. कारण आपल्याला इतिहास इंग्रजांच्या अँगलने दाखवला गेला. खरं तर हे चुकीचं होतं, असंही ते म्हणाले.