आनंद नीलकंठन यांचं ‘नल दमयंती’ स्टोरीटेलवर, मृण्मयी देशपांडे, संदीप खरे यांच्या आवाजात ऐकायला मिळणार
लेखक आनंद नीलकंठन हे पहिल्यांदाच त्यांच्या विलक्षण शैलीतील 'ऑडिओ ड्रामा' घेऊन येत आहेत. स्टोरीटेल ओरिजनलसाठी त्यांनी "नल- दमयंती" या मूळ इंग्रजीतील नव्याकोऱ्या 'ऑडिओ ड्रामा' लेखन निर्मिती केली असून आता हा 'ऑडिओ ड्रामा' आपल्याला मराठीसह एकूण नऊ भारतीय भाषांमध्ये ऐकायला मिळणार आहे.
मुंबई : काल्पनिक आणि पौराणिक कथा आपल्या विलक्षण शैलीत शब्दबद्ध करून तमाम साहित्यप्रेमीमच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे आघाडीचे सिद्धहस्थ लेखक आणि साऱ्या विश्वाला वेड लावण्याऱ्या नेटफ्लिक्सवरील ‘बाहुबली’ (Bahubali) सिरीजचे लेखक आनंद नीलकंठन (Anand Nilkanth) हे पहिल्यांदाच त्यांच्या विलक्षण शैलीतील ‘ऑडिओ ड्रामा’ घेऊन येत आहेत. स्टोरीटेल ओरिजनलसाठी त्यांनी “नल- दमयंती” (Nal-Damyanti) या मूळ इंग्रजीतील नव्याकोऱ्या ‘ऑडिओ ड्रामा’ लेखन निर्मिती केली असून आता हा ‘ऑडिओ ड्रामा’ आपल्याला मराठीसह एकूण नऊ भारतीय भाषांमध्ये ऐकायला मिळणार आहे. मराठीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayi Deshpande), कवी, गीतकार अभिनेते संदीप खरे (Sandip Khare) यांच्या सुरस आवाजात ‘नल- दमयंतीचा ऑडिओ ड्रामा’ ऐकण्यास मिळणार आहे.
नेटफ्लिक्सवरील ‘बाहुबली’ सिरीज आणि ‘असुर’: टेल ऑफ द वॅनक्विश्डच्या’ या पौराणिक कथा कल्पनांतून प्रेरणा घेऊन आधुनिक कादंबऱ्यांची निर्मिती करणाऱ्या आनंद नीलकंठन यांनी ‘सिया के राम'(स्टार प्लस), ‘चक्रवर्तीन अशोक सम्राट'(कलर्स टीव्ही), ‘संकटमोचन महाबली हनुमान'(सोनी टीव्ही), ‘अदालत-2’ (सोनी टीव्ही), ‘सरफरोश – सारागडीची लढाई’ (नेटफ्लिक्स) या पौराणिक तसेच सामाजिक मालिकांचे लोकप्रिय पटकथाकार म्हणून आनंद नीलकंठन सर्वांना परिचित आहेत.
आनंद नीलकंठन यांची ‘ऑडिओ ड्रामा’ लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लेखनाचा अनुभव कथन करताना ते म्हणतात “ऑडिओ ड्रामा तयार करणे हा एक आव्हानात्मक अनुभव होता. मी कादंबर्या आणि स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत, पण ‘ऑडिओ ड्रामा’ लिहिणं वेगळं आहे कारण ऐकणार्याच्या मनात व्हिज्युअल तयार करू शकतील अशा आवाजांवरही ‘ऑडिओ ड्रामा’ लेखन करताना लक्ष केंद्रित करावं लागतं. “नल- दमयंती” या ऑडिओ ड्रामासाठी शब्दांची निवड करताना स्वतःचा कस लागला आहे. माझ्यासाठी हा एक नवीन शिकण्याचा अनुभव होता आणि मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”
“नल- दमयंती” ऑडिओ ड्रामा तुम्ही इंग्रजी आणि मराठी, हिंदी, बंगाली, आसामी, मल्याळम, तेलुगु, गुजराती आणि तमिळ या आठ प्रादेशिक भाषांमध्ये ऐकू शकता. अनेक भारतीय भाषांमध्ये एकाच वेळी हा ऑडिओ ड्रामा प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. “मी हे पुस्तक मुळात इंग्रजीत लिहिले आहे आणि स्टोरीटेलच्या टीमने ते तुमच्या भाषेत प्रकाशित करण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. एकाच वेळी एखादे पुस्तक अनेक भाषांमध्ये येत असण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल,” असे आनंद सांगतात.
विश्वाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्माला, रीसेट बटण दाबून जग संपवायचे आहे. तो मानवाला कंटाळला आहे. मानवाची निर्मिती करून त्याने केलेली ही सर्वात मोठी चूक असल्याचे त्याला वाटते. हेमांगा, मानसरोवरचा सुवर्ण हंस मानवांवर प्रेम करतो आणि म्हणून ब्रह्मा त्यांना नष्ट करेल अशी भीती वाटते. तो ब्रह्मदेवाला विनवणी करतो की त्याला नल आणि दमयंतीच्या प्रेमाद्वारे मानवांमध्ये खरे प्रेम आहे हे सिद्ध करण्याची संधी द्यावी. लेखक आनंद नीलकंठन यांनी ही कथा आपल्याला नव्या दृष्टीकोनातून, आणि आकर्षक शैलीतून सांगितली आहे.
“नल दमयंती ही एक जुनी कथा आहे जी महाभारत, कथासरितसागर आणि अनेक लोककथांमध्ये आढळते. तथापि, माझे पुर्नकथन नलाऐवजी दमयंतीवर केंद्रित आहे. ती एक प्रेरणादायी पात्र आहे आणि तिचा स्त्रीवाद जितका आधुनिक आहे तितकचं तिचं पात्रही तेजस्वी आहे. मला आशा आहे की माझ्या या चिरंतन प्रेमकथेचे सादरीकरण, विनोदाने भरलेले असून श्रोत्यांना त्यांच्या मनात आधुनिक अॅनिमेशन चित्रपट पाहत असल्याची कल्पना करण्यास मदत करेल. जर भारतीय चित्रपट उद्योग पुरेसा धाडसी असेल तर मला आशा आहे की एक दिवस हा एक आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन चित्रपट असेल जो हॉलीवूडमधून आलेल्या कोणत्याही गोष्टीला टक्कर देऊ शकेल” असे लेखक आनंद सांगतात. पुढे ते म्हणतात “कथा मूळ कथानकाप्रमाणेच आहे. ते कसे वेगळे आहे ते व्यक्तिचित्रण आणि थीममध्ये आपण जरूर ऐका. जसे महाभारतातील निराश युधिष्ठर राजाला वनवासात सांगितल्याप्रमाणे, जर मूळ नशिबाच्या अनिश्चिततेबद्दल असेल, तर नशिबावर मात करण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी लढणे आवश्यक आहे असे माझे स्पष्ट म्हणणे आहे”
स्टोरीटेल इंडियाचे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले, “आनंद नीलकंठन यांच्याकडे पौराणिक कथांमधून पुर्नकथन करण्याची अनोखी पद्धत अवगत आहे जी आपल्याला पुराणातील पात्रांचा पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून विचार करण्यास भाग पाडते. स्टोरीटेलवर, अनेक भाषांमध्ये हा ‘ऑडिओ ड्रामा’ रिलीज करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सर्वांना पौराणिक कथा आवडतात आणि त्या ऐकण्यासाठी ‘स्टोरीटेल’पेक्षा वेगळा चांगला मार्ग असूच शकत नाही. तुमच्या आवडीच्या छान कथा कोणीही, कुठेही आणि केव्हाही शेअर कराव्यात आणि त्यांचा आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे.”