गोविंदाच्या पाया पडताच ‘या’ अभिनेत्यावर भडकले पाकिस्तानी चाहते; काय आहे कारण?
गोविंदाच्या पाया पडल्यामुळे पाकिस्तानमध्ये वाद; अभिनेत्यावर भडकले कट्टरपंथी
दुबई: बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा हा एक असा कलाकार आहे, ज्याची लोकप्रियता फक्त देशापुरतीच मर्यादित नाही. जगभरात गोविंदाच्या स्टाइलचे, डान्सचे आणि अभिनयाचे चाहते आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याने गोविंदाविषयी त्याच्या मनात असलेला आदर, प्रेम त्याच्या अंदाजात व्यक्त केला. या कार्यक्रमात फहाद गोविंदाच्या पाया पडल्या. मात्र याच कारणामुळे कट्टरपंथी फहादवर भडकले आहेत.
गोविंदाच्या पाया पडल्याने पाकिस्तानमध्ये वाद
नुकताच दुबईत ‘मिडल ईस्ट अचिवर्स अवॉर्ड’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांनी एकमेकांची भेट घेतली. याच पुरस्कार सोहळ्यातील फहाद मुस्तफाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओमध्ये तो गोविंदाच्या पाया पडताना दिसतोय. गोविंदासुद्धा प्रेमाने त्याला आशीर्वाद देतो आणि मिठी मारतो.
मात्र फहादने गोविंदाच्या पाया पडणं पाकिस्तानमधल्या अनेकांना आवडलं नाही. यावरून त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय. इस्लाममध्ये दुसऱ्यांच्या पाया पडणं योग्य नाही, असं कट्टरपंथीयांचं म्हणणं आहे. एक मुसलमान असून फहाद मुस्तफाने दुसऱ्यासमोर झुकून त्याच्या पाया पडणं इस्लामच्या विरोधात असल्याचं काही जण म्हणत आहेत.
View this post on Instagram
फहादच्या व्हायरल व्हिडीओवरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली. आपला धर्म सोडून त्यांचा धर्म स्वीकार, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याला सुनावलं. इस्लामिक मान्यतांनुसार, इस्लाममध्ये अल्लाहशिवाय कोणत्याही व्यक्तीसमोर, कठपुतलीसमोर झुकणं अमान्य आहे. धार्मिक मान्यतांनुसार, मुसलमान व्यक्ती हा फक्त अल्लाहसमोरच झुकू शकतो. याच कारणामुळे पाकिस्तानी नेटकऱ्यांकडून फहादवर टीका होतेय.
पाकिस्तानी अभिनेता फहाद या कार्यक्रमात फक्त गोविंदाच्या पायाच पडला नाही, तर आपल्या भाषणात त्याने गोविंदाचं कौतुकसुद्धा केलं. गोविंदाचा मी खूप मोठा चाहता आहे, असंही तो म्हणाला. “गोविंदा सरांच्या अभिनयातून प्रेरणा घेऊन मी या क्षेत्रात काम करू लागलो. सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे”, अशा शब्दांत त्याने कौतुक केलं.