मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय या त्यांच्या सौंदर्यामुळे आणि दमदार अभिनयामुळे लोकप्रिय होत्या. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी ‘जरुरत’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी रुपेरी पडद्यावर राज्य केलं. मात्र करिअरच्या शिखरावर असताना रीना यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला आणि प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं. या दोघांनी 1983 मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर रीना पाकिस्तानात गेल्या.
रीना आणि मोहसिन यांना एक मुलगी आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर रीना 1992 मध्ये भारतात परतल्या होत्या. आता या नात्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल मोहसिन खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. “मला कोणताच पश्चात्ताप नाही. मी एका व्यक्तीशी लग्न केलं होतं, त्यावेळी मी हे पाहिलं नाही की ती कुठून आहे आणि कोण आहे. मात्र पाकिस्तानात राहण्याच्या निर्णयावर मी ठाम होतो. पाकिस्तानच आमची ओळख आहे”, असं ते म्हणाले.
लग्नाविषयी ते पुढे म्हणाले, “आमच्या लग्नाआधी मी तिचे कोणतेच चित्रपट पाहिले नव्हते. यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. जर मी घरातून निघालो असतो आणि तिथे अमिताभ बच्चन यांचा सीन चालू असता तर कदाचित मी थांबून ते पाहिलं असतं. पण मी कधीच चित्रपट पाहिले नाहीत आणि सुंदरतेनं मी कधीच प्रभावित झालो नाही. मला ती व्यक्ती म्हणून आवडली होती.”
घटस्फोटानंतर रीना यांना मुलगी सनमचा ताबा मिळाला. याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “ते माझ्या मुलीचे वडील आहेत. ते तिच्या संपर्कात असतात. त्या दोघांमध्ये चांगलं नातं आहे. तेसुद्धा त्यांच्या आयुष्यात खुश आहेत. देव त्यांना खुश ठेवो.”
रीना रॉय यांचं शत्रुघ्न सिन्हा यांच्याशीही नाव जोडलं गेलं होतं. पण त्यांचं प्रेम लग्नाच्या नात्यात रूपांतरित होऊ शकलं नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि रीना यांनी मोहसिन खान यांच्याशी लग्न केलं. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांची भेट ‘मिलाप’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर दोघांनी बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांच्या अफेअरची चर्चा देखील सुरु झाली होती. दोघेही बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.