“मला 4 लग्न करण्याची परवानगी”; पत्नीसमोर अभिनेता हे काय बोलून गेला?
अल्लाहने मला चार लग्न करण्याची परवानगी दिली आहे आणि तसं करण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्याने केलं आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य करताना त्याच्यासमोर त्याची पत्नी बसली होती.

पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं दानिश तैमूर आणि आयेजा खान त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. हा व्हिडीओ एका रिअॅलिटी शोमधला असून त्यामध्ये दानिश बहुपत्नीत्व (एकापेक्षा जास्त लग्न) बद्दल आपले विचार मांडताना दिसतोय. आश्चर्याची बाब म्हणजे दानिश हे सर्व त्याच्या पत्नीसमोरच बोलत होता. “मला चार वेळा लग्न करण्याची परवानगी आहे. पण मी ते करत नाही ही वेगळी बाब आहे. पण ही परवानगी मला अल्लाहने दिली आहे आणि ती माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी हे तिच्यासमोर (पत्नी) सांगितलंय आणि आज मी हे सर्वांसमोर सांगतोय”, असं दानिश म्हणाला.
या शोमध्ये दानिश पुढे म्हणाला, “हे माझं प्रेम आणि आदर आहे ज्यामुळे मी माझं आयुष्य हिच्यासोबत घालवू इच्छितो.” या वक्तव्यावर शोच्या सूत्रसंचालकानेही दानिशचं कौतुक केलं आणि म्हणाला “आयेजासारखी पत्नी भेटल्यावर तुला दुसऱ्यांची काय गरज असेल?” दानिश आणि आयेजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘एकतर हा खूप अहंकारी आहे किंवा कसं बोलायचं हे त्याला माहीत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘चार लग्न न करून पत्नीवर उपकार करतोय का’, असा खोचक सवाल दुसऱ्याने केला.




View this post on Instagram
पुढे शोदरम्यान दानिशने त्याच्या पत्नीला विचारलं, “मला काम करता करता माशाअल्लाह इतकी वर्षे झाली आहेत. जवळपास 15 वर्षे मला या इंडस्ट्रीत झाली आहेत. या प्रवासाबद्दल तू काय विचार केलास? हा कधीपर्यंत सुरू ठेवला पाहिजे?” त्यावर दानिशची पत्नी आयेजा त्याला विचारते, “कामाच्या प्रवासाबद्दल विचारतोय का?” तेव्हा दानिश म्हणतो, “होय, कामाचा प्रवास.” या प्रश्नावर आयेजा उत्तर देते, “मला असं वाटतं की माझं व्यक्तिमत्त्व जसं आहे, त्यावरून मला काम करण्याची खूप हौस आहे. मग ते कोणतंही काम असो. आज या क्षेत्रात मी 100 टक्के मेहनत करतेय. जितकं उत्तम काम करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चांगलं काम करत राहीन. मला काम करायला खूप आवडतं आणि अल्लाह माझ्यासाठी मार्ग स्वत: बनवतोय.”
या सर्व गोष्टींच्या बाबतीत मी मॉडर्न विचारांची असल्याचं आयेजाने स्पष्ट केलं. “जर पुरुष पैसे कमावण्यासाठी बाहेर जात असेल तर दुसऱ्या व्यक्तीने मुलांसोबत राहून त्यांची काळजी घेतली पाहिजे”, असंही मत तिने या शोमध्ये मांडलं.