मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाच्या यशामुळे सध्या चर्चेत असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी गावी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अखेरच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. त्यांचं गाव बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात असून आई-वडील बेलसंड नावाच्या गावी राहायचे. पंकज त्रिपाठी हे याच गावी लहानाचे मोठे झाले. बेलसंड गावी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच पंकज त्रिपाठी त्यांच्या गावी रवाना झाले आहेत.
पंकज त्रिपाठी यांची वडिलांशी फार जवळीक होती. ते मुंबईत कामासाठी स्थायिक झाले असले तरी आईवडिलांची भेट घेण्यासाठी ते सतत गावी जायचे. गावी गेल्यावर ते आवर्जून वडिलांसोबत वेळ घालवायचे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा विविध मुलाखतींमध्येही ते अनेकदा त्यांच्या आयुष्यातील आईवडिलांच्या योगदानाबद्दल व्यक्त व्हायचे. “जर माझ्या पालकांनी माझ्या निर्णयांचा आदर केला नसता तर आज मी इथे नसतो”, असं ते नेहमी म्हणतात.
“माझे वडील इतके भोळे आहेत की त्यांना थिएटर आणि अभिनय याविषयी काहीच माहीत नाही. मी जेव्हा मुंबईत स्थायिक झालो आणि माझे वडील मला भेटायला इथे आले, तेव्हा उंच-उंच इमारती आणि गर्दी पाहून ते घाबरले. त्यांना इथलं राहणीमान अजिबात आवडलं नव्हतं. मुंबईहून गावी गेल्यानंतर ते पुन्हा कधीच इथे परतले नाहीत”, असं पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.