Paresh Rawal: बंगालींवरील ‘त्या’ टिप्पणीमुळे परेश रावल अडचणीत; पोलिसांनी दाखल केली FIR
परेश रावल यांना बंगालींबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं; माफी मागूनही FIR दाखल
कोलकाता: बंगाली लोकांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याने ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते मोहम्मद सलीम यांनी परेश रावल यांच्याविरोधात शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केल होती. ‘परेश रावल यांच्या भाषणातील त्या विधानामुळे बंगाली लोकांविरुद्ध द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते’, असा आरोप त्यांनी या तक्रारीत केला.
भारताच्या इतर भागात राहणाऱ्या बंगाली लोकांनासुद्धा याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असंही त्यांनी तक्रारीत म्हटलंय. आपल्या वक्तव्यावरून वाढत असलेला वाद पाहता नंतर परेश यांनी माफी मागितली. बंगाली समुदाय आणि इतर लोकांकडून जोरदार टीकांनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित माफी मागितली.
पश्चिम बंगालच्या सीपीआय(एम)चे राज्य सचिव सलीम यांनी दावा केला की सार्वजनिक ठिकाणी अशी भाषणं ही दंगली भडकावण्यासाठी आणि जनतेत क्षोभ निर्माण करण्यासाठी केली गेली आहेत. बंगाली समुदाय आणि देशभरातील इतर समुदायांमधील सलोखा नष्ट करण्यासाठी परेश रावल यांनी असं विधान केल्याचा आरोप त्यांनी केला.
Gas cylinder will become cheaper again, inflation will go up & down but what if Rohingyas start living next to you? Gujarat people can tolerate inflation but not this … Way they deliver verbal abuses. A person among them needs to wear diaper on his mouth: Paresh Rawal in Valsad pic.twitter.com/25iruyNhSa
— DeshGujarat (@DeshGujarat) November 29, 2022
काय म्हणाले होते परेश रावल?
गुजरातमधील वलसाडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान परेश रावल म्हणाले होते की, “गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे, पण त्याची किंमत कमी होईल. पण दिल्लीत रोहिंग्या आणि बांगलादेशी तुमच्या आसपास राहू लागले तर काय होईल? गॅस सिलेंडरचं तुम्ही काय करणार? तुम्ही बंगालींसाठी मासे शिजवणार का?” याच विधानावर प्रचंड विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी माफीदेखील मागितली.
“बंगाली म्हणजेच मला बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या असं मला म्हणायचं होतं. मात्र माझ्या टिप्पणीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो”, अशी पोस्ट परेश रावल यांनी लिहिली.