मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील उदयपूरमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी हे दोघेजण उदयपूरला पोहोचले आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारीसुद्धा झाली आहे. परिणीती आणि राघवचे कुटुंबीय, जवळचा मित्रपरिवारसुद्धा उदयपूरला पोहोचला आहे. हे लग्न उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये होणार आहे. त्यासाठी हा पॅलेस अत्यंत सुंदररित्या सजवण्यात आला आहे. या पॅलेसचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये पॅलेसच्या आतील दृश्य पाहायला मिळत आहे. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ हा अत्यंत आलिशान हॉटेल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राघव चड्ढा हा हॉटेलमधून बोटीने विवाहस्थळी पोहोचणार आहे. त्यासाठी बोटीला मेवाडी आणि पारंपारिक स्टाईलमध्ये सजवण्यात येणार आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नासाठी खास तयारी करण्यात आली आहे. तर जेवणासाठी देशातील अत्यंत प्रतिष्ठित शेफ्सना आमंत्रित केलं गेलंय. जेवणामध्ये पंजाबी पदार्थांसोबतच इतरही अनेक पदार्थांचा समावेश असेल. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत खास मेवाडी स्टाईलमध्ये घूमर डान्ससोबत केला जाणार आहे.
‘द लीला पॅलेस’मध्ये एक दिवस राहण्याचा खर्च लाखोंमध्ये आहे. या हॉटेलच्या एका दिवसाचं भाडं जवळपास दहा लाख रुपये असल्यास म्हटलं जात आहे. द लीला पॅलेसमधील महाराजा सुईट 3500 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. परिणीती आणि राघवने त्यांच्या लग्नासाठी सर्वोत्तम हॉटेल निवडलं आहे. कारण द लीला पॅलेसला या वर्षाचा ‘ट्रॅव्हल प्लस लेजर वर्ल्ड सर्वे अवॉर्ड’सुद्धा मिळाला आहे. हे भारतातील टॉप पाच हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलचं लोकेशन, सर्व्हिस आणि सोयी सुविधा सगळेच सर्वोत्तम आहे.
येत्या 25 सप्टेंबर रोजी परिणीती आणि राघव लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर गुरूग्राममध्ये शाही रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्यात परिणिती आणि राघवने साखरपुडा केला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे नेते असल्याने या साखरपुड्याला राजकीय वर्तुळातून अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा समावेश होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीनेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दिल्लीतल्या कपुरथळा इथल्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला होता.