‘आप’ खासदाराशी लग्न करण्याबाबत अखेर परिणीती चोप्राने सोडलं मौन; पहा व्हिडीओ
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र नुकत्याच एका व्हिडीओमध्ये परिणितीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बॉलिवूड आणि राजकारणाचं नातं काही नवीन नाही. आजवर असंख्य सेलिब्रिटींनी राजकीय क्षेत्रात सक्रीय असणाऱ्यांशी लग्नगाठ बांधली. नुकतीच अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केलं. त्यानंतर आता अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या दोघांच्या लग्नाबाबत कोणतीच अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र आता त्यावर पहिल्यांदाच परिणीतीची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिच्या या प्रतिक्रियेनंतर या दोघांचं लग्न पक्कं ठरलंय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.
लग्नाच्या चर्चांदरम्यान परिणीतीला मंगळवारी रात्री मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. परिणीतीला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यावर तिने काही वक्तव्य केलं नाही, मात्र या व्हिडीओत ती लग्नाच्या प्रश्नावर लाजताना दिसतेय. परिणीतीने लाजत हसल्यानंतर तिच्या लग्नाबद्दलच्या चर्चा खऱ्याच आहेत, असं नेटकरी म्हणत आहेत.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
परिणीती आणि राघव यांना एक-दोनदा एकत्र पाहिल्यानंतर अफेअरची चर्चा सुरू झाली. या दोघांच्या लग्नाविषयी प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आपचे खादार संजीव अरोरा यांचं ट्विट चर्चेत आलं. ‘मी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो. हे दोघं प्रेमाने आणि आनंदाने राहु दे, अशा शुभेच्छा मी देतो’, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं. संजीव यांच्या या ट्विटनंतर दोघांच्या लग्नाबाबतच्या चर्चा खऱ्याच आहेत, असं चाहते म्हणत आहेत.
राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.