काय? CID मध्ये एसीपी प्रद्युमन यांची जागा घेणार ‘हा’ तरुण सुपरहॉट अभिनेता?
सीआयडी ही मालिका 21 जानेवारी 1998 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये आदित्य श्रीवास्तव हा इन्स्पेक्टर अभिजीतच्या, दयानंद शेट्टी हा इन्स्पेक्टर दयाच्या आणि नरेंद्र गुप्ता हे डॉ. साळुंखेच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षक ही मालिका आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बघू शकतात.

‘सीआयडी’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या प्रेक्षकांना नुकताच मोठा धक्का बसला आहे. कारण या मालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून एसीपी प्रद्युमन यांची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांच्या भूमिकेचा लवकरच अंत होणार असल्याचं समजतंय. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये एसीपी प्रद्युमन यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मालिकेत त्यांची भूमिका दाखवणार की नाही, जर दाखवली तर शिवाजी साटम यांची जागा कोण घेणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. याप्रकरणी आता एक नवी अपडेट समोर येत आहे. ‘सीआयडी’ या मालिकेत शिवाजी साटम यांच्या जागी एका लोकप्रिय तरुण अभिनेत्याची निवड झाल्याचं कळतंय.
एसीपी प्रद्युमन यांच्या भूमिकेसाठी आता अभिनेता पार्थ समथानची निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी त्याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘सास बहू और बेटियाँ’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत पार्थ म्हणाला, “माझ्यासाठी ही खरीच खूप मोठी जबाबदारी आहे. एसीपी प्रद्युमन ही भूमिकाच खूप मोठी आहे. सोनी टीव्हीवरील ही मालिका आयकॉनिक आहे. याविषयी जेव्हा मी माझ्या कुटुंबीयांशी चर्चा करत होतो, तेव्हा त्यांना मी मस्करी करतोय असं वाटलं होतं. पण जेव्हा मी त्यांना खरंच भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांना माझा खूप अभिमान वाटला. एसीपी प्रद्युमन यांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे.”




View this post on Instagram
“ही एक नवी भूमिका असेल आणि नवी कथा असेल. आम्ही नव्या थरारासह आणि सस्पेन्ससह ही कथा पुढे नेणार आहोत. या मालिकेचा मी एक भाग बनेन असा कधी विचारसुद्धा केला नव्हता. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. मला जेव्हा या भूमिकेसाठी फोन आला होता, तेव्हा मी संभ्रमात होतो की ऑफर स्वीकारावं की नाही? पण मालिकेच्या लोकप्रियतेचा विचार करता माझ्यासाठी ही सन्मानाची बाब असेल. मालिकेत एसीपी प्रद्युमन यांचा मृत्यू दाखवला गेला आहे. परंतु ही त्यांची हत्या असते. त्यांच्या हत्येचं गूढ उकलण्यासाठी एजन्सीकडून नव्या एसीपीची नियुक्ती करण्यात आली आहे. एसीपी आयुषमान असं माझ्या भूमिकेचं नाव असेल”, असं त्याने पुढे सांगितलं.
मालिकेत इतर केस सोडवण्यासोबतच एसीपी आयुषमान हा एसीपी प्रद्युमन यांच्या हत्येमागचंही गूढ शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. एसीपी प्रद्युमन यांच्या मृत्यूप्रकरणात इतर सर्व पात्रांवर संशय आहे. परंतु एसीपी आयुषमानची भूमिका ही एसीपी प्रद्युमन यांच्यासारखी नसेल.