Pathaan: “शिवसेनेच्या झेंड्यातही तो रंग असताना..”; भगव्या बिकिनीवरून मुकेश खन्नाही भडकले
'बेशर्म रंग' गाण्यातील भगव्या बिकिनीचा वाद; 'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना यांचा सेन्सॉर बोर्डाला सवाल
मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. या गाण्यातील एका दृश्यात दीपिकाने केसरी रंगाचा बिकिनी परिधान केला आहे. त्यावरूनच काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. आता या गाण्यावर ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
बेशर्म रंग गाण्यावर भडकले मुकेश खन्ना
पायल रोहतगी आणि शर्लिन चोप्रा यांच्यानंतर आता मुकेश खन्ना हेसुद्धा बेशर्म रंग गाण्यावर भडकले आहेत. शाहरुख आणि दीपिकाच्या चित्रपटातील या गाण्याला त्यांनी अश्लील असं म्हटलंय.
“आजकालची मुलं ही टीव्ही आणि सिनेमे पाहून मोठी होत आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने अशी गाणी पास केली नाही पाहिजेत. सेन्सॉर बोर्ड काही सुप्रीम कोर्ट नाही, ज्याचा विरोध आपण करू शकत नाही”, असं ते नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
“तरुणवर्गावर आणि लहान मुलांवर वाईट परिणाम”
“आपला देश काही स्पेन बनला नाही, जिथे अशा प्रकारची गाणी शूट केली जातील. आता अर्ध्या कपड्यांमध्ये गाणी शूट केली जात आहेत. काही काळानंतर विवस्त्रच गाणी शूट केली जातील. सेन्सॉर बोर्डाकडून अशी गाणी का पास केली जातात तेच मला कळत नाही”, अशा शब्दांत मुकेश खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली.
भगवा रंग हा एका धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, हे गाणं बनवणाऱ्याला माहीत नाही का, असाही सवाल त्यांनी केला. “ज्याला आपण भगवा म्हणतो, जो रंग शिवसेनेच्या झेंड्यातही आहे, आरएसएसमध्येही आहे. जर ही गोष्ट माहीत आहे, तर गाणं बनवणाऱ्याच्या मनात कसले विचार असतील? अमेरिकेत तुम्ही त्यांच्या झेंड्याची बिकिनीही घालू शकता. पण हिंदुस्तानमध्ये असं करण्याची परवानगी नाही”, असं ते म्हणाले.
याआधीही अनेक अभिनेत्रींनी भगव्या रंगाचे कपडे परिधान करून गाणी शूट केली आहेत. तेव्हा आक्षेप का नाही घेतला, असा प्रश्न विचारला असता ते पुढे म्हणाले, “तेव्हा अशा पद्धतीची बिकिनी बनवून त्यावर गाणी शूट केली नाही जायची. आता सोशल मीडिया आहे, लोक आवाज उठवू शकतात.”