मुंबई- दिग्दर्शक साजिद खानने (Sajid Khan) ‘बिग बॉस 16’च्या घरात एण्ट्री केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र विरोध केला. मी टू मोहिमेअंतर्गत साजिदवर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. असे आरोप असलेल्या व्यक्तीला बिग बॉसच्या घरात संधी कशी दिली जाते, असा सवाल सोशल मीडियावर केला गेला. इतकंच नव्हे तर अभिनेत्री मंदाना करिमीने (Mandana Karimi) यानंतर बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. मंदानानेही साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. बॉलिवूडमध्ये महिलांसाठी आदर नाही, असं म्हणत तिने पुन्हा इंडस्ट्रीत काम न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi) साजिदच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने मंदानाचं नाव न घेता तिला टोला लगावला आहे.
‘साजिद खानने सहा महिलांसोबत दुर्व्यवहार केला. त्या सहा जणांनी सार्वजनिकरित्या तसं स्पष्ट केलं. त्याच्या अशा वागणुकीसाठी त्याला सार्वजनिकरित्या फटकारलं गेलं, अपमानित केलं गेलं. आता त्याच सहा महिला त्याला कोर्टातही खेचू शकतात. पण मला एका गोष्टीची आठवण सर्वांना करून द्यायची आहे. महात्मा गांधींच्या तत्वांनुसार, हत्येकरूलाही सुधारण्याचा अधिकार असतो. तसंच इथे साजिद खानलाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला पैसे कमावण्याचा अधिकार आहे. त्याला पश्चात्ताप करण्याचा अधिकार आहे. त्याला त्याच्या अधिकारांसाठी लढू द्या. तुम्ही त्याचा विरोध करा, पण बॉलिवूड सोडण्याचा ड्रामा करू नका’, अशी पोस्ट पायलने लिहिली.
आणखी एका पोस्टमध्ये पायलने मंदानाला इराणमध्येही न राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘तू इराणमध्येही राहायला नाही पाहिजे, कारण तिथेसुद्धा महिलांचा आदर केला जात नाही.’
काही दिवसांपूर्वी मंदानाने कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये भाग घेतला होता. या शोचे पैसे न मिळाल्याची तक्रारही तिने केली होती. याच शोमध्ये पायलसुद्धा सहभागी झाली होती. रखडलेल्या पैशांबाबत तिने पुढे लिहिलं, ‘तू शो सोडलास आणि जेव्हा एखादा स्पर्धक शो सोडतो, तेव्हा त्याच्या पेमेंटशी संबंधित काही नियम, अटी असतात. मला शो संपल्यानंतर दहा दिवसांत माझं संपूर्ण मानधन मिळालं.’
स्वत:ला सुधारण्याची एक संधी द्यावी, यासाठी शोमध्ये भाग घेतल्याचं साजिद खानने पहिल्या दिवशी स्पष्ट केलं. “गेल्या चार वर्षांपासून मी काम नसल्याने घरीच बसलोय. मी माझ्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांना अपयश उद्ध्वस्त करतं. पण माझ्या बाबतीत यशानेच मला उद्ध्वस्त केलं. मी खूप अहंकारी बनलो होतो”, अशी कबुली साजिदने सलमानसमोर दिली.