संसदेपर्यंत पोहोचली ‘छावा’ची जादू; पंतप्रधान नरेंद्र मोदी बघणार विकी कौशलचा चित्रपट
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'ची जादू संसदेपर्यंत पोहोचली आहे. कारण या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन संसदेकडून करण्यात आलं आहे. या स्क्रिनिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित राहणार आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने जगभरात कमाईचा 700 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इतकंच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘छावा’चं कौतुक केलं होतं. आता ते विकी कौशलच्या या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये सहभागी होणार आहेत.
संसदेत ‘छावा’च्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं जाणार आहे. संसदेच्या लायब्ररी इमारतीच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये विकी कौशलचा हा चित्रपटा दाखवला जाईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच केंदीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर मंत्री, खासदारसुद्धा उपस्थित राहणार आहेत. संसदेकडून आयोजित केलेल्या या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेता विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजनसुद्धा उपस्थित राहणार आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाषण करताना ‘छावा’चं कौतुक केलं होतं. “मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीलाही ही उंची महाराष्ट्र आणि मुंबईने दिली आहे. आणि आजकाल छावा या चित्रपटाची तर धूम आहे”, असं ते म्हणाले होते.




View this post on Instagram
विकी कौशलचा हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 40 दिवस उलटले तरीही थिएटरमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘छावा’ने आतापर्यंत भारतात 597.66 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने अनेक मोठमोठ्या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मात दिली आहे.
प्रदर्शनाच्या तिसाव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘छावा’ने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला ‘छावा’ आणि ‘पुष्पा 2: द रुल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होते. मात्र अल्लू अर्जुनने ‘छावा’च्या निर्मात्यांना फोन करून प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानंतर ‘छावा’च्या प्रदर्शनाची तारीख 6 डिसेंबरवरून 14 फेब्रुवारी करण्यात आली. याचा फायदा या दोन्ही चित्रपटांना झाला.