लाच न दिल्याने पद्मभूषण राशिद खान यांची कार पोलिसांकडून जप्त; घटनेविषयी संताप व्यक्त
पोलिसांना लाच न दिल्याने ड्राइव्हरला अटक, कार केली जप्त; पद्मभूषण राशिद खान कोर्टात घेणार धाव?
कोलकाता: प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांनी लाच न दिल्याने पोलिसांनी विनाकारण त्रास दिल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांची कार एका प्रसिद्ध संगीतकाराला दमदम इथल्या नेताजी सुभाष चंद्र बोस एअरपोर्टवर सोडून परत येत होती. त्यावेळी कोलकाताच्या बेलेघाटा ट्रॅफिक गार्ड पोलीस अधिकाऱ्यांनी कारला थांबवलं. यावेळी पोलिसांनी लाच मागितल्याचा आरोप राशिद यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा ड्राइव्हर एअरपोर्टवरून परत येत होता, तेव्हा कारचालक आणि बॉडीगार्डकडे पोलिसांनी लाच मागितली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना वाईट वागणूक देण्यात आली. कारचालकाला ताब्यात घेऊन प्रगती मैदानातील पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. इतकंच नव्हे तर गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केली.
बॉडीगार्डकडून घटनेची माहिती मिळताच उस्ताद राशिद खान यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात फोन करून ड्राइव्हरला अटक करण्यामागचं कारण विचारलं. त्यावेळी राशिद यांनाही पोलीस ठाण्यात बोलावलं गेलं. जेव्हा राशिद खान पोलिस ठाण्यात पोहोचले, तेव्हा पोलिसांनी ड्राइव्हरला सोडलं. त्याचसोबत जप्त केलेली कारसुद्धा परत केली.
राशिद यांनी घडलेल्या घटनेची माहिती राज्याचे मंत्री इंद्रनील सेन यांना फोन करून दिली. मात्र याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. या घटनेनंतर राशीद खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलिसांनी कार जप्त का केली आणि ड्राइव्हरला अटक का केली, याची उत्तरं राशीद यांना मिळाली नाही. त्यांच्याकडून योग्य उत्तर न मिळाल्यास राशिद खान कोर्टात धाव घेणार असल्याचंही म्हटलं जातंय.
उस्ताद राशिद खान यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं. ते कोलकातामधील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार आहेत. याआधीही त्यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. देशात आणि परदेशातही त्यांनी शास्त्रीय संगीताची अनेक कार्यक्रमं केली आहेत.