भयानक कार अपघातातून थोडक्यात बचावली प्रसिद्ध गायिका; म्हणाली ‘त्या 10 सेकंदात मला..’
रक्षिताने नुकतंच मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटाच्या कन्नड व्हर्जनमधील गाणं गायलं आहे. पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटातीलही एक गाणं तिच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. रक्षिताने ए. आर. रेहमान यांची अनेक गाणी गायली आहेत.
मुंबई : हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये गाणं गायलेली गायिका रक्षिता सुरेश ही मलेशियात एका मोठ्या कार अपघातातून थोडक्यात बचावली, रविवारी हा अपघात झाला असून त्याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ड्रायव्हर, कारमधील इतर सहप्रवासी आणि स्वत: रशिक्षा यांना थोडीफार दुखापत झाली आहे. रविवारी सकाळी मलेशियातील विमानतळाकडे जाताना तिची कार दुभाजकाला जोरात धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की त्याच्या आठवणीने अजूनही थरकाप उडत असल्याचं तिने लिहिलं आहे.
रक्षिताची पोस्ट-
‘आज मोठा अपघात झाला. सकाळी मी मलेशियाच्या विमानतळाकडे जात असताना आमची कार रस्त्यावरील दुभाजकाला जोरात धडकली. त्यानंतर ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली. त्या 10 सेकंदांमध्ये मला माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्य दिसलं. एअरबॅग्जमुळे आपले प्राण वाचले, अन्यथा परिस्थिती आणकी वाईट असती’, असं रक्षिताने लिहिलं आहे.
‘जे काही घडलं, त्या घटनेतून मी अजूनही सावरले नाही. तो अपघात आठवला तरी माझं अंग थरथर कापतंय. मी, ड्रायव्हर आणि इतर सहप्रवासी सुरक्षित आहेत. आम्हाला फक्त थोडीफार दुखापत झाली आहे. पुनर्जीवन मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे’, असंही तिने पुढे म्हटलंय.
View this post on Instagram
रक्षिताने नुकतंच मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटाच्या कन्नड व्हर्जनमधील गाणं गायलं आहे. पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटातीलही एक गाणं तिच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. रक्षिताने ए. आर. रेहमान यांची अनेक गाणी गायली आहेत. मिमी, कोब्रा, वेंधू थनिंधतू काडू यांसारख्या चित्रपटांसाठी तिने पार्श्वगायन केलं आहे.
रक्षिताने 2018 मध्ये ‘सुपर सिंगर 6’ या तमिळ सिंगिग रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली होती. तर सेंथिल गणेशने विजेतेपद पटकावलं होतं. त्याआधी 2009 मध्ये तिने ‘लिटिल स्टार सिंगर’ या रिअॅलिटी शोचं विजेतेपद पटकावलं होतं. वयाच्या 11 व्या वर्षी तिने हा विजय मिळवला होता.