मुंबई : 2 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं’, असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्वाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे’, असं त्यात लिहिलं आहे. अवघ्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला आहे.
पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती. 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती. भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं. तिच्या या व्हिडीओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती. पूनमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली होती.
पूनमने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असतात. या चित्रपटानंतरचा काळ खूप कठीण असल्याचं सांगत पूनम ‘लॉक अप’ या शोमध्ये म्हणाली होती, “त्या चित्रपटानंतर मला ज्या काही ऑफर्स येत होत्या ते मी घेऊ नये असं अनेक लोक सांगू लागले. मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे.”
सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर हा सध्या महिलांमध्ये वाढणारा कॅन्सर आहे. अनेकांना अजूनही याच्याबद्दल पुरेशी माहिती नाही. या कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला खूपच सौम्य असू शकतात. योनीमार्गातून असामान्य रक्तस्राव होणं, दोन मासिक पाळीदरम्यान, लैंगिक संबंधांदरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून असामान्य द्रव स्रवणं, लैंगिक संबंधांदरम्यान खूप वेदना होणं अशी त्याची लक्षणं आहेत. सर्वाइकल कॅन्सरचं एक प्रमुख कारण म्हणजे एचपीव्ही किंवा ह्युमन पॅपिलोमाव्हायरसचा संसर्ग. या कॅन्सरच्या जवळपास 99 टक्के केसेसेमध्ये हा विषाणू आढळतो.