Poonam pandey : बॉलीवूड इंडस्ट्रीतून आज सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली. अभिनेत्री पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली, ज्यामध्ये पूनम पांडेचा मृत्यू गर्भाशयाच्या कर्करोगाने झाल्याचे सांगण्यात आले होते. कर्करोगामुळे एकाच दिवसात मृत्यू कसा होऊ शकतो असा प्रश्न लोकं उपस्थित करु लागले आहेत. पूनम पांडेच्या मृत्यूबाबत कुटुंबीय किंवा बहिणीकडून अद्याप कोणतीही पुष्टी आलेली नाही. पत्रकारांनी पूनम पांडेच्या जवळच्या व्यक्तीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण कोणतीही माहिती समोर आली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पूनमच्या बहिणीने फोनवर ती आता या जगात नसल्याची माहिती दिली होती. पण यानंतर तिचा फोन बंद येत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमध्ये म्हटले होते. याबाबत प्रायव्हेसी ठेवावी असं आवाहन देखील पोस्टमध्ये करण्यात आली होती.
पूनम पांडेच्या बहिणीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता तिचा फोन बंद आहे. इतकंच नाही तर तिच्या कुटुंबातील कोणासोबतच संपर्क होत नाहीये. तिच्या कुटुंबातील व्यक्ती कुठे आहे याची माहिती देखील पुढे येत नाहीये. पूनमच्या टीममधील लोकांचा फोन देखील बंद आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी पूनम पांडे एका इव्हेंटमध्ये दिसली होती. तिने चार दिवसांपूर्वी एक पोस्ट देखील शेअर केली होती, ज्यामध्ये ती एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. तिने एका इव्हेंटमध्ये सांगितले होते की, ती व्यवस्थित आहे आणि मजेत आयुष्य जगत आहे. पण अचानक तिच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. पूनम पांडे शेवटची कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.