‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची धमाकेदार एण्ट्री; ‘देवयानी’तून पोहोचला घराघरात
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. हा अभिनेता या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर तो स्टार प्रवाहवरील मालिकेत कमबॅक करत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. लवकरच या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवीची एण्ट्री होणार आहे. ‘देवयानी’ मालिकेमुळे संग्राम घराघरात पोहोचला. ‘तुमच्यासाठी कायपण’ हा त्याचा सुपरहिट डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘देवयानी’ आणि ‘कुलस्वामिनी’ या स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारलेला संग्राम जवळपास सहा वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे.
येड लागलं प्रेमाचं मालिकेत होणाऱ्या एण्ट्रीविषयी सांगताना संग्राम म्हणाला, “स्टार प्रवाह कुटुंबाचा मी जुना सदस्य आहे. या कुटुंबासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. देवयानी मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही प्रेक्षक देवयानी मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करतात. तुमच्यासाठी कायपण हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवण्याची मागणी करतात. इतक्या वर्षांनंतरही या पात्राविषयी असलेलं प्रेम पाहून भारावून जायला होतं.”
View this post on Instagram
“‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मी साकारत असलेलं पात्रदेखील हटके आहे. खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कस लागतो. भूमिकेतले बारकावे हळूहळू आत्मसात करतोय. मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम या पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन,” असं तो पुढे म्हणाला. ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.
माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडत आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्रं आहेत. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम, स्वाभिमान मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुजा बिरारी हे या मालिकेत राया आणि मंजिरीची भूमिका साकारत आहेत.