चेहऱ्यावर वैताग, भय… भांबावलेपण… प्राजक्ता माळीला अश्रू अनावर; पत्रकार परिषदेत काय काय म्हणाली?
भाजपा आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत जे वक्तव्य केलं होतं त्या सर्व आरोपांवर संताप व्यक्त करत प्राजक्तानं पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे, एवढच नाही तर "वैयक्तिक स्वार्थासाठी अभिनेत्रींची नावं का घेतात ?"असा संतप्त सावल करत तिने धसांना खडे बोल सुनावले.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी इव्हेंटबाजीचा परळी पॅटर्न सुरु असल्याचा आरोप केला होता. धस यांनी पत्रकारांशी बोलताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. या आरोपांना प्राजक्ता माळीने पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली तसेच या प्रकरणात सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील प्राजक्तानं केली.
त्याचबरोबर या प्रकरणाची महिला आयोगाकडं तक्रार केली असल्याचं प्राजक्तानं स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना समज द्यावी अशी मागणी देखील प्राजक्ता माळीनं या पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी प्राजक्ताची अस्वस्थता
पत्रकार परिषद सुरु होण्याआधीची काही सेकंद जर पाहिलं तर प्राजक्ताचा राग, चिडचिड आणि तिचं भांबावलेपण स्पष्ट दिसतं होतं. तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल तिच्या मनात जी घुसमट सुरु होती ती तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. मात्र प्राजक्ताने स्वत:चा राग अनावर न होऊ देता तिने परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि अगदी शांतपणे तिने प्रत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली.
काय म्हणाली प्राजक्ता?
पत्रकार परिषद सुरु करताना प्राजक्ताने सर्वप्रथम सर्व प्रत्रकारांचे आभार मानले, आणि आपली बाजू मांडायला सुरुवात केली. प्राजक्ताने म्हटलं “सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण माझी शांत होते म्हणजे या सगळ्याला माझी मूक संमती नाहीये. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढवलं आहे.” असं म्हणत तिने राग व्यक्त केला.
पुढे प्राजक्ता म्हणाली,” एक व्यक्ती रागाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्या दोन वाक्यांचे हजारो व्हिडीओ बनवले जातात, तेवढेच दोन शब्द पकडले जातात. आणि त्यावरून यूट्यूब चॅनल्सवर हजारो व्हिडीओ बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्यावर विधान करायला भाग पाडलं जातं. मग समोरची व्यक्ती देखील पुन्हा काहीतरी बोलते. ही चिखलफेक चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं”, अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं आपला संताप व्यक्त केला.
“वैयक्तिक स्वार्थासाठी अभिनेत्रींची नावं का घेतात ?”
तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता? असा संतप्त सवाल प्राजक्ताने विचारला. ती म्हणाली ” अतिशय कुत्सितपणे त्यांनी ही टिप्पणी केली. परळीला पुरूष कलाकार गेले नाहीत का? एका फोटोच्या आधारे तुम्ही कोणासोबतही नाव जोडणार का? वैयक्तिक स्वार्थासाठी अभिनेत्रींची नावं घेतली जातात. फक्त चारित्र्यावरच नाही तर कर्तृत्वारही शिंतोडे उडवले जात आहेत. मी आज महिला आयोगाकडेही तक्रार नोंदवलेली आहे. कायद्याच्या कचाट्यात राहून संबंधितांवर कारवाई करावी अशी महिला आयोगाला विनंती केली आहे. समाजात अशा पद्धतीने एखाद्याची प्रतिमा डागाळली जातेय.” असं म्हणत या सर्व जाणूनबुजून केल्याचं प्राजक्ताने म्हटलं.
प्राजक्ताला अश्रू अनावर
प्राजक्ताने कठोर शब्दात तिच्यावरील आरोपांचा समाचार घेतला. ती म्हणाली, “माझ्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांचा निषेध करते. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. आपला टीआरपी वाढविण्यासाठी कोणत्याही थाराला जातात. तुमच्या राजकारणासाठी आमच्या सारख्या महिला कलाकारांची अब्रु वेशीवर का टांगता ?” असा संतप्त सवाल करताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले.
धसांनी माफी मागण्याच्या मागणीवर प्राजक्ता ठाम
पुढे तिने करूणा मुंडेंचही नाव घेत त्यांनाही यावर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. प्राजक्ता म्हणाली “माझी करूणाताईंनाही विनंती आहे की, तुम्हाला जी माहिती मिळालेली आहे.ती पूर्णपणे चुकीची आहे. मुख्यमंत्र्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की, यावर कडक आणि ठोस कारवाई करावी. यापुढे अशा कार्यक्रमांनाही जाताना कलाकारांना विचार करावा लागेल. सुरेश धस यांनाही विनंती केली आहे की, त्यांनी जाहीर माफी मागावी.” असं म्हणत आजच्या पत्रकार परिषदेत प्राजक्ताने धसांना माफी मागण्यासाठी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे.
“खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करा…”
दरम्यान प्राजक्ताने तिच्याबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचीही भेट घेणार असल्याचं आणि त्यांना वैयक्तिक भेटून पत्र देणार असल्याचंही तिने म्हटलं.
प्राजक्ता म्हणाली “आपल्याकडे ज्या ज्या न्यूज पोर्टलने विविध प्रकाराच्या बातम्या केल्या. याला काहीही पुरावे नसताना या बातम्या केल्या जातात. अशा बातम्या करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. धस यांच्या विधानाचा अर्थ कळू नये एवढी दूधखुळी तर मी नक्कीच नाही. राजकीय व्यक्तींच्या स्वार्थासाठी आमच्या नावांचा वापर नको. हशा पिकवण्यासाठी सुरेश धस यांनी केलेलं विधान हे खालच्या पातळीचे आहे” असं म्हणत प्रजक्ताने धसांसह खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.