मुंबई : अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं तिच्या इन्स्टाग्रामवर नव्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आणि सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा सुरू झाली. प्रार्थनाने स्विमिंग पूलजवळ निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मोनॉकिनीमध्ये हे फोटोशूट केलं आहे. मात्र तिचा हा बोल्ड अंदाज काही नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नाही. प्रार्थनाच्या या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांमध्येच दोन गट पडले आहेत. यातील एक गट तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करत आहे तर दुसरा गट प्रार्थनाचा बचाव करत आहे.
प्रार्थना बेहरेच्या या मोनॉकिनीमधील फोटोंवर मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे, पूजा सावंत, श्रेयस तळपदे यांनी प्रार्थनाच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. श्रेयसने ‘पुष्पा’च्या स्टाइलमध्ये कमेंट केली आहे. ‘फ्लावर समझे क्या, फायर है मॅडम’ असं त्याने म्हटलं. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांकडून प्रार्थनावर जोरदार टीका होत आहे.
अशा अंगवस्त्रांमुळे आजकालच्या मुली खूपच वाया जात आहेत. आधी कलाकारांनी आपलं सौंदर्य नीट सांभाळून ठेवा, मग जगासमोर उभे रहा, असं एकाने म्हटलंय. तर ‘ताई तुमच्या फोटोंमधून चुकीचा संदेश जातोय. मराठी संस्कृतीला हे शोभत नाही’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘सुंदरतेची व्याख्या फक्त नग्न फोटो असा ट्रेंड का होतोय? अंगभर कपड्यांमध्ये जी शालिनता, राजसपणा आहे तो वितभर बिकिनीत नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
प्रार्थनाच्या चाहत्यांनी मात्र तिची बाजू घेत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काही पुरुष मंडळी तिला संस्कृती जपण्याचं सांगत आहेत. जसं काय तिने एकटीनेच ठेका घेतलाय. स्विमिंग कॉस्च्युम घालून स्विमिंग करणार नाही तर काय साडी घालून करणार का’, असा सवाल एका चाहत्याने केला. तर ‘सर्वजण नकारात्मक कमेंट्स का करत आहेत. प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये फरत असतो. कोणाच्याही पर्सनल लाइफमध्ये बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला’, अशा सवाल एका युजरने टीकाकारांना केला. संस्कृती मध्ये आणण्याआधी आपले विचार बदलावेत, असा सल्ला काहींनी ट्रोलर्सना दिला.
काही नेटकऱ्यांनी प्रार्थनाची तुलना गौतमी पाटील आणि उर्फी जावेदशीही केली आहे. प्रार्थनाच्या या फोटोंवर एक लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत. या ट्रोलिंगवर अद्याप तिने कोणतंच उत्तर दिलं नाही.