‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाची मोठी टिप्पणी; ‘बॉयफ्रेंडनेच तिच्या आयुष्याचं नर्कात..’
2016 मध्ये 24 वर्षीय 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रत्युषाच्या कुटुंबीयांना तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.
मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : दिवंगत टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला मोठा झटका दिला आहे. प्रत्युषाने 11 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राजला तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झाली होती. याप्रकरणी नंतर राहुलला जामिन मिळाला. मात्र सात वर्षांनंतर सत्र न्यायालयाने राहुलची आरोपातून मुक्तता करण्यास नकार दिला आहे. राहुलने कोर्टात अर्ज देत मागणी केली होती की त्याची आरोपांतून मुक्तता करण्यात यावी. मात्र कोर्टाने त्याच्या अर्जाला फेटाळत त्याच्यावर कठोर शब्दांत टिप्पणी केली आहे. राहुल राज सिंहमुळेच प्रत्युषाने टोकाचं पाऊल उटललं, असं कोर्टाने म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्याने तिच्या आयुष्याचं रुपांतर नर्कात केलं होतं, असंही कोर्टाने म्हटलंय.
‘राहुलकडून प्रत्युषाचं शोषण’
2016 मध्ये 24 वर्षीय ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली होती. राहुल राज सिंहच्या शोषणामुळे प्रत्युषाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असं कोर्टाने म्हटलं आहे. ‘हे स्पष्ट होतंय की आरोपीने शारीरिक, भावनिक आणि आर्थिक रुपात प्रत्युषाचं शोषण केलं आहे. याच कारणामुळे ती नैराश्यात गेली होती. कोर्टासमोर सादर झालेल्या सर्व पुराव्यांमधून हेच स्पष्ट होतंय की राहुलने तिच्या समस्या किंवा त्रास कमी करण्यासाठी कोणतीच पावलं उचलली नव्हती. याउलट त्याने त्याच्या वागणुकीमुळे प्रत्युषाला आत्महत्येचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त केलं’, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
कोर्टाने राहुलचा अर्ज फेटाळला
राहुलने 14 ऑगस्ट रोजी स्वत:ची आरोपांतून मुक्तता होण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी न्यायमूर्तींनी अर्ज फेटाळत ही टिप्पणी केली. बालिका वधू या मालिकेतून प्रत्युषा घराघरात पोहोचली होती. कोर्टाने आपल्या आदेशात त्या साक्षीदाराचाही उल्लेख केला, जो समुपदेशक आहे. प्रत्युषाने समुपदेशनासाठी अपॉईंटमेंट घेतली होती. मात्र आत्महत्येच्या एक दिवस आधी तिने ती अपॉईंटमेंट रद्द केली. त्याआधी तिने मेंटल हेल्थच्या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क साधला होता. मी नैराश्यात असून माझ्या रिलेशनशिपमुळे खूप त्रस्त असल्याचं तिने म्हटलं होतं.
‘पैशांसाठी प्रेमाचा वापर करून फसवणूक’
‘प्रत्युषाची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं माहीत असूनही त्याने कोणतीच मदत केली नाही. राहुल राजने प्रत्युषाला बळजबरीने दारू पाजली होती. तो पैशांसाठी प्रेमाचा वापर करत तिची फसवणूक करत होता. अभिनेत्रीचे आईवडील, काका-काकी, मित्र, कर्मचारी, शेजारी यांच्या जबाबांमधून प्राथमिकदृष्ट्या हेच स्पष्ट होतंय की राहुलने हळूहळू प्रत्युषाच्या संपूर्ण आयुष्याला स्वत:च्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्युषाचे डेबिट कार्डसुद्धा राहुलकडे असायचे. हजार, दोन हजार रुपयेसुद्धा तिला त्याच्याकडे मागावे लागायचे’, असं कोर्टाने म्हटलंय.
या सर्व आरोपींना राहुल राजच्या वकिलांनी न्यायालयात फेटाळलं. डिसेंबर 2016 मध्ये दोघं लग्न करणार होते, असं राहुलच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्याउलट राहुलने पैशांसाठी प्रत्युषाचा छळ केल्याचं कोर्टाने म्हटलंय. ‘राहुलने स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला स्थिर करण्यासाठी पार्टनरचा वापर केला,’ असंही कोर्टाने नमूद केलं.