मुंबई : ‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 2016 मध्ये 24 वर्षीय प्रत्युषाने आत्महत्या केली होती. त्यावेळी प्रत्युषाच्या कुटुंबीयांना तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. आता तब्बल सात वर्षांनंतर राहुल राजचं वक्तव्य समोर आलं आहे. राहुलने सुरुवातीपासूनच त्याच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र तरीही त्याला दोषीच्या नजरेतून पाहिलं गेलं. आता प्रत्युषाच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी तो एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने सांगितलं की, या आरोपांमुळे त्याचं करिअर कशाप्रकारे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.
राहुल म्हणाला, “प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. माझ्या जगण्याचा उद्देश काय, हेच मला समजत नव्हतं. मी एकटाच राहू लागलो होतो. जसजसा वेळ गेला, तसा मी काही प्रमाणात सावरलो. मी कामावर परतण्याचा विचार केला. एक-दोन ठिकाणी प्रयत्नही केले, पण मला कोणालाही काम द्यायचं नव्हतं. काही लोकांनी माझ्याकडून बळजबरीने काम हिसकावून घेतलं.”
“मला लॉकअप या शोची ऑफर देण्यात आली होती. पण त्यावेळी विकास गुप्ताने माझा पत्ता साफ केला. त्याने निर्मात्यांवर इतका दबाव टाकला की नंतर त्यांनी मला शोमध्ये कास्ट करण्यास नकार दिला. याआधीही विकासने माझ्यासोबत असं केलं होतं. त्यामुळे माल अनेक शोज गमवावे लागले होते. विकास गुप्ताने मला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. मी किती संघर्ष केला हे फक्त मलाच माहीत आहे. लाखो नकार झेलल्यानंतर आता कुठे मला एका गाण्याची ऑफर मिळाली आहे”, अशा शब्दांत त्याने दु:ख मांडलं आहे.
राहुल राज लवकरच अंकित तिवारीच्या ‘बेपरवाह 2’ या म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. प्रत्युषाबद्दल तो पुढे म्हणाला, “तिच्या निधनानंतर तीन दिवस मी शुद्धीवर नव्हतो. झोपेच्या गोळ्याही काम करत नव्हत्या. तिच्या मृत्यूसाठी लोकांनी मला जबाबदार ठरवलं होतं. पण हे कसं शक्य असू शकतं? प्रत्युषाच्या निधनाच्या एक रात्र आधी आम्ही एकत्र पार्टी केली होती. आमच्या दोघांमध्ये सर्वकाही ठीक होतं. आमच्या नात्यात काहीच तक्रारी नव्हत्या. त्यावेळी ती आई-वडिलांवरील कर्जाबद्दल चिंतेत होती. मात्र तिच्यासोबत मी सदैव राहण्याचं तिला वचन दिलं होतं. आपण दोघं मिळून सर्व समस्यांना सामोरं जाऊ आणि सगळं ठीक करू असं तिला म्हटलं होतं.”