रणदीप हुडाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदना निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे.
रणदीप हुडाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 8.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रणदीपचा हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीसुद्धा चित्रपट पाहिल्यानंतर फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.
प्रवीण तरडेंची पोस्ट
‘॥ धर्मो रक्षति रक्षित:॥ अफाट अचाट आयुष्य जगलेल्या, जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या, महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्ट. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. रणदीपने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी त्याला प्रचंड बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही करावं लागलं. सुरुवातीला या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र शूटिंगदरम्यान काही मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर रणदीपने दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी जबाबदाऱ्या पेलल्या आहेत.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रणदीपसोबतच अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणदीप म्हणाला, “हा चित्रपट वीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1897 ते 1950 या दरम्यानच्या काळातील ही कथा आहे. त्यांच्याबद्दलची सर्व चुकीची माहिती मी निर्भयपणे हाताळली आहे. हा चित्रपट जेव्हा माझ्याकडे आला होता, तेव्हा मला वाटलं होतं की मी त्यांच्यासारखा दिसू शकणार नाही. म्हणून मी भूमिकेसाठी खूप वजनसुद्धा कमी केलं. त्यांच्याविषयी जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मला समजलं की मला फारसं माहितच नाही. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती, तेवढंच मला माहीत होतं. त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी आपल्याला शाळेतही शिकवल्या नाहीत किंवा इतर ठिकाणीही फारसं बोललं जात नाही. त्यांचं नाव घेतल्या घेतल्या लोक वादाला सुरुवात करतात. मला या गोष्टींचा राग होता आणि म्हणूनच मी हा चित्रपट बनवायचं ठरवलं.”