Ravindra Mahajani | रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर प्रवीण तरडेंनी दिला गश्मीरला धीर; भावूक व्हिडीओ समोर
दिग्दर्शक प्रवीण तरडे, किरण यज्ञोपवीत, अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते. वडिलांच्या निधनाने खचलेल्या गश्मीरला यावेळी प्रवीण तरडेंनी आधार दिला.
पुणे, 17 जुलै 2023 | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी हे शुक्रवारी तळेगाव इथल्या सदनिकेत मृतावस्थेत आढळले. शनिवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. रवींद्र महाजनी हे गेल्या आठ महिन्यांपासून तळेगावमधल्या आंबी इथल्या एका सदनिकेत भाड्याने एकटेच राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गश्मीर महाजनी, मुलगी डॉ. रश्मी, सून आणि नातवंडं असा परिवार आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे गश्मीरला धीर देताना दिसत आहेत. या व्हिडीओत गश्मीरसोबतच त्याची आईसुद्धा पहायला मिळतेय.
रवींद्र महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून एकटेच राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. गश्मीरला याबद्दलची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तो मुंबईहून तळेगावला रवाना झाला. आईची प्रकृती बरी नसल्याने गश्मीरने सुरुवातीला वडिलांच्या निधनाची माहिती त्यांना दिली नव्हती. शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.
दिग्दर्शक प्रवीण तरडे, किरण यज्ञोपवीत, अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यावेळी उपस्थित होते. वडिलांच्या निधनाने खचलेल्या गश्मीरला यावेळी प्रवीण तरडेंनी आधार दिला.
मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. त्यांचा जन्म बेळगावमध्ये झाला होता. ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी यांचे ते पुत्र होते. मुंबईतील खालसा महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना रॉबिन भट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर यांच्यामुळे महाजनी यांच्या अभिनयातील आवडीला खतपाणी मिळालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं. रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि रवींद्र महाजनी चांगलेच प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या, ज्या चांगल्याच गाजल्याही. 1975 ते 1990 पर्यंतचा कालखंड त्यांनी गाजवला.