दहा वर्षांनी मोठ्या सलमानसोबत अफेअर? नेटकऱ्याच्या प्रश्नावर प्रिती झिंटाचं उत्तर
अभिनेत्री प्रिती झिंटाने सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. सलमानसोबतचे काही फोटो पोस्ट करत तिने शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर एका युजरने तिला प्रश्न विचारला की, तुम्ही दोघांनी कधी एकमेकांना डेट केलंय का?
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सलमानची अत्यंत खास आणि जवळची मैत्रीण प्रिती झिंटानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याला शुभेच्छा दिल्या. प्रितीने ट्विटरवर सलमानसोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले. या फोटोंसोबत तिने लिहिलं, ‘हॅपी बर्थडे सलमान खान. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मी तुझ्यावर सर्वांत जास्त प्रेम करते. बाकीचं मी तुझ्या बोलेन तेव्हा सांगेन… आणि हो.. आपल्याला आणखी फोटो काढण्याची गरज आहे. अन्यथा मी तेच तेच जुने फोटो पोस्ट करेन.’ प्रितीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.
सलमान आणि प्रितीचे फोटो पाहून एका युजरने कमेंट बॉक्समध्ये तिला प्रश्न विचारला, ‘तुम्ही दोघांनी कधी एकमेकांना डेट केलंय का?’ त्यावर प्रिती उत्तर देते, ‘नाही, अजिबात नाही. तो माझ्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे, माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि माझ्या पतीचा मित्रसुद्धा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणून मी स्पष्ट करतेय. माफ करा, मी उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही.’ प्रितीच्या या उत्तराने चाहत्यांच्या मनातील संभ्रम मात्र कायमचा दूर झाला, असं म्हणायला हरकत नाही.
Happy Burrday @BeingSalmanKhan 🎂Just wanna say I love you the mostest 🥳 Rest will tell you when I speak to you ….. and yes we need more photos otherwise I will keep posting the same old ones ! Ting 💕 pic.twitter.com/XLVHxTIFY6
— Preity G Zinta (@realpreityzinta) December 27, 2024
सलमान खान आणि प्रिती झिंटाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘जानेमन’, ‘दिल ने जिसे अपना कहा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी भूमिका साकारल्या आहेत.
सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण अर्पिता खानने तिच्या निवासस्थानी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला मोजके कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. त्यानंतर सलमान त्याच्या कुटुंबीयांसोबत जामनगरला जंगी बर्थडे पार्टीसाठी गेला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी सलमानच्या वाढदिवसानिमित्त या पार्टीचं आयोजन केलं होतं. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाचा टीझर किंवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्याने टीझर-ट्रेलरचं लाँचिंग पुढे ढकललं आहे.